Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गरीब कर्मचाऱ्याचे थकीत वेतन न देणाऱ्या या जोडगोळीला कोणती शिक्षा होणार?

युनिव्हर्सल फायर अँड सेफ्टी सर्व्हिसेस चा व्यवस्थापकीय संचालक राहुल लोंढे ने थकवले माजी कर्मचाऱ्याचे वेतन

नवी मुंबई, दि.१३: मार्च महिन्यात देशात भूतो न भविष्यती असं ‘लॉकडाऊन’ लागू झालं आणि सामान्य गरीब जनतेची ससेहोलपट सुरू झाली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्यामुळे त्यांना आर्थिक गणितं जुळवता-जुळवता नाकी नऊ आले आणि अद्यापही सगळीकडे तीच परीस्थिती आहे. याच सोबत अनेक आस्थापनांनी कर्मचारी कपात केली किंवा वेतन कपात केली. या कठीण काळात बर्‍याच आस्थापनांनी आपल्या कर्मचार्‍यांना हातच्या फोडाप्रमाणे जपलं. पण काही अशीही आस्थापनं आहेत ज्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडलंच पण त्यांच्या हक्काचे जे थकीत वेतन होते त्यावरही डल्ला मारला.

आज आम्ही ‘आपली समस्या’ या सदराअंतर्गत एका सामान्य होतकरू तरुणाची एका कंपनीकडून कशी फसवणूक चालू आहे ते सांगणार आहोत. नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहतीतील ‘युनिव्हर्सल फायर अँड सेफ्टी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल लोंढे व व्यवस्थापक विनोद हीसारिया यांनी बाबू पवार या एका होतकरू तरुणाचे वेतनापोटी झालेले २६,४००/- रुपये थकवल्याबाबतची तक्रार चार दिवसांपूर्वी आमच्या अधिकृत क्रमांकावर आली होती. या प्रकरणी तपशिलात गेल्यावर असे कळले की बाबू पवार या सी.ए. च्या परीक्षेची तयारी करणार्‍या युवकाने ‘युनिव्हर्सल फायर अँड सेफ्टी प्रायवेट लि.’ या कंपनीत डिसेंबर २०१९ च्या मध्यापासून अकाउंट्स विभागात काम करावयास सुरुवात केली. यावेळी या युवकाला अपॉईंटमेंट लेटर देण्याचे फक्त आश्वासन देऊन रु. २५,०००/- दर महा वेतनावर कंपनीत रुजू करण्यात आले. दरम्यान डिसेंबर महिन्याचे वेतन दिल्यावर बाबू पवार ला जानेवारी महिन्याचे फक्त अर्धेच वेतन अदा करण्यात आले. बाकीचे वेतन पुढच्या महिन्यात देतो असे राहुल लोंढे व विनोद हीसारिया यांनी सांगितल्याचे बाबू पवार म्हणाला. याच काळात कंपनीतील रोजचे कामकाजासंबंधी वातावरण बरोबर नसल्याचे जाणवल्यामुळे बाबू पवार ने आपण महिन्याभराने नोकरी सोडू असे या दोघांना सांगितले व दिलेल्या शब्दाप्रमाणे अखेर महिना पूर्ण झाल्यावर त्याने आपली सुटका करून घेतली. यावेळी मार्च महिन्यात आम्ही तुला जानेवारी चे बाकी वेतन व फेब्रुवारी चे वेतन एकत्रच देतो असे राहुल लोंढे व विनोद हीसारिया यांनी त्याला सांगितले. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत बाबू पवार जुन्नर येथील आपल्या गावी गेला.

आज सात महीने होत आले पण ही मंडळी या तरुणाचे घामा-रक्ताच्या कमाईचे २६,४००/- रुपये देण्यास आज देतो उद्या देतो म्हणत टाळाटाळ करत आहेत. या तरुणाचे सध्या घरभाडेही थकले असून आज त्याची घरची परिस्थितीही हलाखीची आहे. अशा वेळी बाबू पवार ने महाराष्ट्र वार्ता ला संपर्क केल्यावर छोटा विषय असल्यामुळे आम्ही थेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल लोंढे व व्यवस्थापक विनोद हीसारिया यांना ई-मेल व व्हाट्सअप्पद्वारे या तरुणाचे थकीत वेतन अदा करण्याची विनंती केली. पण या द्वयीने याचे अद्याप उत्तरही दिलेले नाही. ही मुजोरीच म्हणावी. शिवाय या कंपनीतील आणखी काही जणांचे वेतनही गेल्या ६ महिन्यांपासून यांनी थकवल्याचे आम्हाला कळले.

महिनाभर काम करवून घेऊन अखेर पगाराच्या दिवशी नेमकी थातूरमातूर कारणे सांगून अशा प्रकारे कर्मचार्‍यांचा शारीरीक व मानसिक छळ करणार्‍या मालक-व्यवस्थापकांना वठणीवर कसे आणायचे याचे नेमके तंत्र, कसब ‘महाराष्ट्र वार्ताच्या’ ‘आपली समस्या’ टीमकडे असून या ठगांवर कठोर-कायदेशीर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र वार्ताचे पूर्ण सहकार्य या तरुणाला असेल. एवढ्या छोटया पण बाबू पवारसाठी मौल्यवान असलेल्या रकमेसंदर्भातील समस्येसाठी बातमी करण्याची महाराष्ट्र वार्ताची ही पहिलीच वेळ आहे. कारण अशा समस्यांबाबत समोरील आस्थापन, व्यक्ति अथवा यंत्रणा यांना कॉल अथवा पत्र(मेल) केल्या-केल्या तात्काळ हालचाल होऊन समस्येचे निराकरण होते. पण या ठिकाणी ही मंडळी कोणा वेगळ्याच मस्तीत आहेत जी योग्य वेळी उतरेलंच. असो पण चालू पीत पत्रकारितेच्या (पेड न्यूज) काळात निरपेक्ष भावनेने आपले कर्तव्य पार पाडणार्‍या आमच्यासारख्या माध्यमांच्या विनंतीकडे दुर्लक्ष होणे ही फारच चिंतादायक बाब आहे.

तुमच्याहि अशाच प्रकारच्या वेतना संदर्भातल्या, अनधिकृत बांधकाम, प्रदूषण, फसवणूक, महिला अत्याचार ई. बाबतच्या काही समस्या असतील तर आम्हाला news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे व 9372236332 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे तपशीलवार-पुराव्यानिशी माहिती पाठवू शकता. आम्ही नक्कीच त्याची दाखल घेऊ.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *