Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Crime! पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा मनीषा धारणे यांचा गंभीर आरोप

प्राचार्य राहुल भिमराव बळवंत उर्फ राहुल भिमराव कोळी यांच्या नियुक्तीवरच उपस्थित होतेय प्रश्नचिन्ह

पुणे, दि. २८ : पुणे येथील प्रतिष्ठित अशा भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल भिमराव बळवंत उर्फ राहुल भिमराव कोळी यांनी नोकरीवर रुजू होताना बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा भांडाफोड याच महाविद्यालयाशी संबंधित एका शिक्षकांनी माहिती अधिकारा अंतर्गत उपलब्ध केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शिवसेना युवती सेनेच्या पुणे जिल्हा समन्वयक मनीषा धारणे यांनी केला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

राहुल भिमराव बळवंत/कोळी यांची १० ऑक्टोबर २००६ रोजी अनुसूचित जमाती प्रवर्गा (महादेव कोळी) अंतर्गत अभिनव कला महाविद्यालयाच्या सहाय्यक अध्यापक पदि नियुक्ती करण्यात आली होती. या पदासाठी जुलै २००६ साली निवड झाल्यानंतर, राज्याच्या कलासंचालनालयाद्वारे निर्गमित आदेशाप्रमाणे त्यांनी सहा महिन्यांच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र जर सादर केले तरच त्यांना नियुक्ती पत्र मिळणार होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नियुक्तीपूर्वी एक बनावट जात प्रमाणपत्र क्र. २८७७० (Dated – २९/०९/२००६) अभिनव महाविद्यालयास जमा केल्याचा गंभीर आरोप मनीषा धारणे यांनी केला आहे. याला आधार देताना त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या महितीनुसार कॉलेज च्या रेकॉर्ड मध्ये राहुल कोळी(बळवंत) यांची दोन जात वैधता प्रमाणपत्र होती. त्यात हे एक जूनं बनावट प्रमाणपत्र जे एका दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे नोंद असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत मिळाली याचसोबत तपासणी दिनांक २/५/२००९ रोजीचे जात वैधता प्रमाणपत्र (क्र. ०८१९५३) असे दुसरे नवे प्रमाणपत्र रेकॉर्ड ला होते. अभिनव कला महाविद्यालयाच्या प्रशासनाने अध्यापकांची माहिती देताना काही कागदपत्रांवर जाहीररीत्या राहुल बळवंत/कोळी(Rahul Balwant Koli) यांनी सादर केलेल्या २/५/२००९ सालच्या प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला आढळतो. इथेच खरी गोम आहे. मनीषा धारणे पुढे म्हणातात जर नियुक्ती २००६ साली झाली होती तर २००९ सालचे प्रमाणपत्र मागाहून अभिनव च्या प्रशासनाने प्राचार्य बळवंत/कोळी यांच्याकडून कोणत्या आधारावर जमा करून घेतले? कारण जर नियमाप्रमाणे नियुक्तीपूर्वी जात वैधता प्रमाणपत्र जमा केले नसेल तर राहुल बळवंत/कोळी यांची सहाय्यक अध्यापकपदि केलेली तत्कालीन नियुक्तीच अवैध ठरते. आणि जर कॉलेज प्रशासन मानतं की हे (बनावट) प्रमाणपत्र कोळी(बळवंत) यांनी १०/१०/२००६ ला सहाय्यक अध्यापक पदि नियुक्ती होण्यापूर्वी दिलं होतं तर मग हे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याची पडताळणी का नाही केली गेली?

काही प्रश्न अनुत्तरीतच; पोलिस तपासात उघडणार नेमकं गुपित? 

या प्रकरणी अधिक संशोधन केले असता महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता टीम ला काही प्रश्न पडले, ते असे की जर अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल भिमराव बळवंत उर्फ राहुल भिमराव कोळी यांनी नियमांनुसार जे जात वैधता प्रमाणपत्र नियुक्ती पूर्वी कॉलेज प्रशासनास देणे अपेक्षित होते ते देण्यास ३ वर्षांचा अवधी का लावला? कारण जर खरंच राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी हे अनुसूचित जमाती (महादेव कोळी) अंतर्गत मोडत असतील तर त्यांनी २००६ साली ६ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र का मिळवले नाही. अशी कोणती अडचण त्यांना होती की ते त्यांना मिळू शकत नव्हते. शिवाय अभिनव कला महाविद्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. कारण त्यांनी कोणत्या नियमाद्वारे राहुल कोळी यांची १०/१०/२००६ रोजी सहाय्यक प्राध्यापकपदि नियुक्ती केली? कारण तत्कालीन कला संचालक, कला संचालनालय (महाराष्ट्र राज्य) प्रा. न. बा. पासलकर यांनी अभिनव कला महाविद्यालयास राहुल बळवंत/कोळी व इतर उमेदवारांच्या नियुक्ती संबंधीच्या मान्यता पत्रात स्पष्ट नमूद केले होते की, “वरील सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करून नियुक्ती स्वीकारणे अनिवार्य राहील”. याचा स्पष्ट अर्थ असा लावता येईल की अभिनव कला महाविद्यालयाच्या प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्राच्या सत्यतेची नीट चौकशी केली नाही किंवा कला संचालनालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांचा अवमान करत प्राचार्य राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी यांना नियुक्तीपत्र दिले. या सार्‍या प्रकरणातले गौडबंगाल समोर आल्यानंतर मनीषा धारणे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे सदर प्रकरणाकडे लक्ष वेधले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्यांनी तात्काळ स्वारगेट पोलिस स्थानकास तपास करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिस उप-निरीक्षक राजश्री पाटील ह्या सदर प्रकरणाचा तपास करत आहेत. शिवसेना युवतीसेनेच्या पुणे जिल्हा समन्वयक मनीषा धारणे या गेली १२ वर्षे या अभिनव कला महाविद्यालयात व संबंधित भारतीय कला प्रसारिणी सभा या संस्थेतील अनियमिततेविरोधात वेळोवेळी आंदोलन करत आलेल्या आहेत.

पुण्यातील ‘भारतीय कला प्रसारिणी’ सभेचा अध्यक्ष जयदीप लडकत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बनावट जात वैधता प्रमाणपत्रातील वास्तव पोलिस तपासाअंती नक्कीच उजेडात येईल परंतु, अभिनव कला महाविद्यालयासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदि बसलेल्या व्यक्तीबाबत असे आरोप होणे नक्कीच भूषणावह नाही. गत वर्षी भारतीय कला प्रसारणीचे अध्यक्ष जयदीप लडकत यांच्या विरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीसंबंधी पुणे पोलिसांमार्फत गुन्हा दाखल होत त्यांना अटकही झाली होती. त्यावेळीही संस्थेची नाचक्की झाली होती. अशा घटना जर वारंवार होत असतील तर कला संचालक, तसेच राज्य धर्मादाय आयुक्त यांनी वेळीच हस्तक्षेप करत संस्थेच्या सबंध कारभाराचे मूल्य-मापान करणे गरजेचे आहे. अन्यथा घोटाळेबाज मोकाट सुटलेल्या वळूसारखे खुलेआम कायद्याची पायमल्ली करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. यांना वेळीच आवर घातला जावा इतकीच माफक अपेक्षा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *