Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार

“क्रीडापटूंच्या कठोर परिश्रमांमुळे एका प्रेरणादायी कामगिरीसह देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे.”

“क्रीडापटू, केवळ क्रीडा क्षेत्रामध्येच नव्हे तर इतरही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देशातील युवा वर्गाला देत असतात”

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदके अशी उल्लेखनीय कामगिरी  केल्याबद्दल या पथकातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये या पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. क्रीडापटूंच्या कठोर परिश्रमामुळेच एका अतिशय प्रेरणादायी कामगिरीसह देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या काही आठवड्यात देशाने क्रीडा क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या कामगिरी केल्या आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी बरोबरच देशाने पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाडचे यजमानपद भूषवले. “बर्मिंगहॅममध्ये तुम्ही विविध खेळांमध्ये खेळत असताना कोट्यवधी भारतीय येथे भारतात रात्री उशिरापर्यंत जागरण करत होते आणि तुम्हा प्रत्येकाच्या खेळाचा आनंद घेत होते.अनेक लोक  गजर लावून झोपत होते जेणेकरून त्यांना तुमच्या कामगिरीची ताजी माहिती मिळवता येईल,” असे पंतप्रधानांनी या खेळाडूंना सांगितले. या पथकाला स्पर्धेसाठी रवाना करताना जे आश्वासन दिले होते त्यानुसार आज आपण विजय साजरा करत आहोत, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अनेक पदके अत्यंत कमी फरकाने हुकली असल्यामुळे पदक तालिकेतील पदकांची संख्या यामागची संपूर्ण कथा दर्शवत नाही. तरीही आपले दृढ-निश्चयी खेळाडू लवकरच ही कसर भरून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वेळेच्या तुलनेत भारताने 4 नवीन सामन्यांमध्ये नवा मार्ग शोधल्याचे त्यांनी सांगितले. लॉन बाउलस पासून ते अॅथलेटिक्सपर्यंत खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे देशातील नवीन खेळांकडे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या लेकींनी बॉक्सिंग, ज्युडो आणि कुस्तीमध्ये मिळवलेले यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मधील त्यांचे वर्चस्व याचा देखील पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. पदार्पण करणाऱ्या खेळाडूंकडून 31 पदके मिळाली आहेत. यामधून युवा खेळाडूंचा वाढता आत्मविश्वास दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या खेळाडूंनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संकल्प केवळ देशाला पदक देऊनच नव्हे, तर उत्सव साजरा करण्याची आणि अभिमान बाळगण्याची संधी देऊन बळकट केला आहे. पंतप्रधान म्हणाले की खेळाडूंनी देशातल्या तरुणांना केवळ खेळातच नव्हे, तर अन्य क्षेत्रांमध्ये देखील उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा दिली आहे. “तुम्ही देशाला विचार आणि ध्येय्याच्या एकात्मतेने विणले आहे, जे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे देखील एक मोठे सामर्थ्य होते”, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्य योद्ध्यांच्या आकाशगंगेचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की पद्धती वेगळ्या होत्या, तरी त्या सर्वांचे ‘स्वातंत्र्य’ हे एकच ध्येय्य होते. तसेच, आपले खेळाडू देखील देशाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानात उतरतात. पंतप्रधानांनी नमूद केले की युक्रेनमध्ये भारताच्या तिरंगा ध्वजाची ताकत दिसली, ज्या ठिकाणी तो केवळ भारतीयच नव्हे, तर अन्य देशांच्या नागरिकांना देखील युद्ध भूमीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीचे सुरक्षा कवच बनला. खेलो इंडियाच्या व्यासपीठावर उदयाला आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. TOPS (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना) च्या, सकारात्मक परिणामांचा देखील त्यांनी उल्लेख केला, जे आताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मध्ये दिसू लागले आहेत. देशातल्या नवीन प्रतिभांचा शोध घेऊन त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचे आपले प्रयत्न आणखी तीव्र करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट, सर्वसामावेशक, वैविध्यपूर्ण आणि गतिमान क्रीडा क्षेत्राची परिसंस्था निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. कुठलीही प्रतिभा मागे राहू नये”, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. खेळाडूंच्या याशामागे असलेल्या क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रशासक आणि अन्य सहकारी कर्मचारी यांच्या भूमिकेचा देखील पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी  खेळाडूंनी उत्तम तयारी करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वावानिमित्त पंतप्रधानांनी गेल्या वर्षी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना देशातील ७५ शाळा आणि शैक्षणिक संस्थाना भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्शाहन देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील अनेक खेळाडूंनी ‘मीट द चॅम्पियन’ मोहिमेअंतर्गत अनेक शाळांना भेटी दिल्या. क्रीडापटूंनी हे अभियान यापुढेही सुरु ठेवावे कारण देशातील युवावर्ग  क्रीडापटूंना आपला आदर्श मानतात, असे पंतप्रधान म्हणाले. तुमची वाढती लोकप्रियता, क्षमता आणि सर्वमान्यतेचा लाभ देशातील युवा पिढीसाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करून खेळाडूंचे  त्यांच्या ‘विजय यात्रे’बद्दल अभिनंदन केले आणि भविष्यातील कामगिरीसाठी  त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या पंतप्रधानांच्या अविरत प्रयत्नाचा भाग म्हणून हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी, पंतप्रधानांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी आणि टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पॅरा-अॅथलीट्सच्या तुकडीशी संवाद साधला होता. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यानही, पंतप्रधानांनी खेळाडूंच्या एकंदर कामगिरीकडे विशेष लक्ष दिले आणि खेळाडूंनी मिळवलेले यश आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांना अधिक चांगला  खेळ करण्यास प्रोत्साहन दिले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 बर्मिंगहॅम येथे 28 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित करण्यात आल्या  होता. एकूण 215 क्रीडापटूंनी 19 क्रीडा शाखांमधील 141 स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये भारताने विविध क्रीडा प्रकारांमध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *