बीएसएनएल नागपूर क्षेत्रद्वारे २० व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन
नागपूर, दि. ११: केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड-बीएसएनएलच्या नागपूर कार्यालयाद्वारे येत्या १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान 20व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून १२ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी १० वाजता आमदार निवास परिसरात बीएसएनएलच्या महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांच्या हस्ते होणार असून सन्माननीय अतिथी म्हणून कोअर नेटवर्क पश्चिम क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत पाटील उपस्थित राहतील तर अध्यक्षस्थानी बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पान्हेकर राहतील अशी माहिती आज बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. १२ ते १५ फेब्रुवारी या चार दिवसीय सांस्कृतिक टूर्नामेंट मध्ये १५ राज्यातून १४८ सहभागी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील ज्यामध्ये एकल गायन, एकल वाद्य संगीत ,एकल नृत्य त्याचप्रमाणे समूह नृत्य, नाटक यांचा समावेश राहणार आहे. स्पोर्टस टूर्नामेंट मध्ये १७ राज्यातून २०० खेळाडू सहभाग घेणार असून या स्पोर्ट्स टूर्नामेंट सेमिनरी हिल्स येथील बीएसएनएलच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये होणार आहेत तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण हे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे होणार आहे अशी माहिती पान्हेकर यांनी यावेळी दिली.
बीएसएनएल बोर्डाने घालून दिलेल्या नियमांनुसार सदर स्पर्धा आयोजित केल्या जातील. विजेत्या संघ आणि सहभागींना ट्रॉफी, मेडल आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे खेळाडू, व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या बीएसएनएलच्या कर्मचारी अधिका-यांना बीएसएनएल तर्फे आर्थिक मदत दिली जाते. या व्यतिरिक्त अशा खेळाडूंना विशेष वेतनवाढ, आउट ऑफ टर्न प्रमोशन, रोख पुरस्कार, संचार क्रीडा पुरस्कार अशा प्रोत्साहनांसाठी देखील विचारात घेतले जाते.