Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन

मुबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन

मुंबई, दि. ५: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे. पु. ल. कला महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला, कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम सादर होईल. गुरुवार, दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता नवीन लघुनाट्यगृहात पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या ‘शतदीप उजळले’ या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरेल पहाट सजणार आहे. त्यासोबतच संध्या. ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले दिव्यदृष्टी असलेले कलाकार मल्लखांबाचे नेत्रदीपक सादरीकरण कलाकार सादर करणार आहेत. तर सायं. ७:३० वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, वाशी यांच्यावतीने कलांगण येथेच गायन, वादन व नृत्याचा आनंददायी आविष्कार अर्थात ‘संगीत संध्या’ रंगणार आहे.

शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५:३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्यिक आणि सांगीतिक भावबंध उलगडणारा ‘शोंगित शिल्पी पी. एल. बाबू’ हा कार्यक्रम कलांगण येथे सादर होईल. यात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर सहभागी होणार असून जेष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यकमाचे निरुपण धनश्री लेले करणार आहेत.  सायं. ७:३० वाजता कलांगण येथेच विदुषी आशा खाडीलकर आणि सहकारी ‘पु. ल. एक आनंदस्वर” या पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित कार्यक्रमाद्वारे रसिकांची संध्याकाळ सुरेल करणार आहेत.

शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं.५ वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सूरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायं.७ वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण ‘लोकरंग दिवाळी संध्या’ या कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत.

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर २०२३ सायं. ६ वा. अभिजात रंगयात्रा या संस्थेचे कलाकार संग्रहापलिकडचे पु.ल. हा पु. ल. देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. तद्नंतर उत्स्फूर्त, ठाणे यांचे कलाकार अभिवाचन, नाट्यप्रवेश यांसह दृकश्राव्य सादरीकरणातून ‘स्त्री व्यक्तिरेखा…. पु. ल. यांच्या लेखनातल्या’ हा कार्यक्रम कलांगण येथे सादर करणार आहेत. विक्रम संवत्सर २०८०च्या प्रतिपदेला अर्थात मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मधुर स्वरांनी ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव – दीपावली पहाट’ कलांगण येथे रंगणार आहे.

तर बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, ‘फुलवा मधुर बहार’ हे संगीत बालनाट्य कलांगण, मुंबई ही संस्था सादर करणार आहे. सायं. ५ वाजता नवीन लघुनाट्यगृहात, भारतीय मूर्तीकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून ‘भगवती’ हा स्त्री-शक्तीचा जागर करणारा  कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करणार आहेत.

पु. ल. कला महोत्सवाची सांगता रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे होणार आहे. ‘पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा’, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *