कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन
नवी मुंबई, दि. १०: पावसाळा कालावधीत नवी मुंबई शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियोजन बैठका पार पडल्या असून पावसाळापूर्व कामे तसेच पावसाळा कालावधीत तत्परतेने करावयाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा कृती आराखडा तयार करण्यात येऊन त्यानुसार अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पावसाळा कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून आपत्तीप्रसंगी मदत कार्य करावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्दैश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.
त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई तसेच गटारे सफाई व मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई कामे पूर्ण केली असून खाडीतील भरतीचे पाणी सामावून घेणा-या होल्डींग पॉन्ड्सची फ्लॅप गेट्स दुरुस्तीची कामेही पूर्ण केली आहेत. पावसाळा कालावधीतील मदत कार्याकरिता नमुंमपा मुख्यालयातील ३६५ दिवस २४ X ७ कार्यरत असणा-या तात्काळ कृती केंद्राच्या जोडीला आठही विभाग कार्यालयांमध्ये तसेच पाचही अग्निशमन केंद्रांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही सर्व केंद्रे पावसाळा कालावधीत दिवस-रात्र २४ तास मदतीसाठी तत्पर असणार असून त्याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आठही विभाग कार्यालयांमध्ये संबंधित विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शोध व बचाव पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये त्या विभागातील पोलीस, वाहतुक पोलीस, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, पोहणा-या व्यक्ती अशा ३६ विविध प्राधिकरणांच्या/संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सर्व आपत्कालीन नियंत्रण कक्षात टिकाव, फावडे, पाणी उपसा पंप, धान्यसाठा अशा आवश्यक बाबींची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करुन ठेवण्यात आलेली आहे. दरडप्रवण क्षेत्रात आवश्यक दक्षता घेण्यात आलेली आहे. वाहतुकीला अडचण होईल अशा अथवा धोकादायक झाडांच्या फाद्यांची गरजेनुसार छाटणी करण्यात आलेली आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती आकस्मिकपणे उद्भवून एखाद्या भागातील लोकांचे स्थलांतरण करावे लागल्यास त्यांच्या तात्पुरत्या निवा-यासाठी विभागनिहाय संक्रमण शिबिराच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. नमुंमपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादीही घोषित करण्यात आली आहे.
पावसाळा कालावधीत उद्भवणारे जलजन्य आजार व साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच सर्व नागरी आरोग्य केंद्रे व रुग्णालये येथे पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्यात आलेला आहे. आपद्ग्रस्तांवरील उपचारार्थ सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे १० बेड्स आणि नेरुळ व ऐरोली रुग्णालय येथे प्रत्येकी ५ बेड्सचे नियोजन करुन ठेवण्यात आलेले आहे.
९ जून रोजी सकाळी ८.३० वा. पासून, १० जून रोजी सकाळी ८.३० पर्यंत नमुंमपा क्षेत्रात ३५.६७ मि.मि. पावसाची नोंद झाली असून यंदाच्या पावसाळी कालावधीत नमुंमपा क्षेत्रात ४४.७७ मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्प परिसरात आज १२.८० मि.मि पावसाची नोंद झाली असून या मोसमात २९.६० मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. सद्यस्थितीत मोरबे धरणाची पातळी ६९.७७ मि.मि. असून पावसाळी कालावधीत पाणी पुरवठा स्वच्छ व शुध्द राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका पावसाळा कालावधीतील मदत कार्यासाठी सज्ज असून नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर प्राधिकरणांच्या सहयोगाने आपत्ती निवारणासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असलेल्याची माहिती देत शहर आपत्ती निवारण समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पावसाळी कालावधीत अडचणीच्या प्रसंगी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्यांनी २४ X ७ कार्यरत असणा-या नमुंमपा तात्काळ कृती केंद्राशी 27567060 /7061 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309/2310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.