परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयामुळे प्रवाशांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर विशेष नोंदणी आणि वितरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने संबंधित नागरिकांनी नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी या केंद्रांद्वारे सातत्याने सेवा दिली जात आहे. अनेक ठिकाणी विशेष शिबिरे, एसटी आगारांमधील नोंदणी केंद्रे आणि प्रवासी सुविधा केंद्रांच्या माध्यमातूनही स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, शासनाच्या महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची अचूक नोंद ठेवणे, सवलतींच्या वितरणात पारदर्शकता आणणे आणि डिजिटल तिकीट व्यवस्थेला चालना देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे तिकीट वितरण प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि अचूक होणार असून प्रवाशांना वारंवार कागदपत्रे दाखविण्याची आवश्यकता राहणार नाही.
राज्य शासनाने कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून कार्ड विक्री करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वितरण केंद्रांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय समान प्रवास सुविधा संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले हे स्मार्ट कार्ड भविष्यात विविध सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एकाच कार्डच्या माध्यमातून अनेक सेवा वापरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी १ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. संबंधित लाभार्थ्यांनी जवळच्या नोंदणी अथवा वितरण केंद्राशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य परिवहन व्यवस्थेचे आधुनिकीकरण, डिजिटल व्यवहारांचा विस्तार आणि प्रवासी सवलत योजनांचे प्रभावी व्यवस्थापन या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात एसटी सेवांमध्ये तंत्रज्ञानाधारित सुविधा अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

