धमकीचे ई-मेल मिळाल्यानंतर न्यायालयीन इमारती रिकाम्या; ठाणे न्यायालय, मेट्रो स्थानके आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा उल्लेख
ठाणे, दि. २ : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्याने राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये धमकीचे ई-मेल आल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन न्यायालयीन परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, धमकीचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस आणि सायबर यंत्रणांकडून घेतला जात आहे.
ठाणे जिल्हा न्यायालयाला मिळालेल्या ई-मेलमध्ये आयईडीच्या माध्यमातून स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदेशात २७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख आहे. याशिवाय, रात्री ९.११ वाजता मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आल्याचे समजते.
ई-मेलमध्ये १९८४ मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण दिलजीत दोसांझ यांचा साथीदार असल्याचा दावा केला आहे. २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून स्फोट घडवण्याची धमकीही या संदेशात देण्यात आली आहे.
ई-मेलमध्ये, “मराठी बांधवांनो, आपल्या मुलांना वाचवा, २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवले जातील.” असा मजकूर असल्याचे वृत्त आहे.
ठाणे न्यायालयाच्या दोन्ही इमारती रिकाम्या; बॉम्बशोधक पथकाची तपासणी
ठाणे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर आज सकाळी ९.४३ वाजता बॉम्ब ठेवल्याचा संदेश आला. दुपारी ३.११ वाजता स्फोट होणार असल्याचा उल्लेख या पंजाबी भाषेतील ई-मेलमध्ये करण्यात आला होता.
धमकीचा संदेश मिळताच पोलिसांनी निर्धारित सुरक्षा कार्यपद्धतीनुसार न्यायालयाच्या दोन्ही इमारती रिकाम्या केल्या. इमारतींमधील लोकांना वरच्या मजल्यांपासून खालीपर्यंत बाहेर काढून न्यायालय परिसरापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून न्यायालयाच्या दोन्ही इमारतींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आठ मजले, वाहनतळ, कँटीन आणि इतर परिसराची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखा आणि सायबर सेलमार्फत तपास
धमकीचे ई-मेल कोणी पाठवले, त्यामागील उद्देश काय आहे आणि संदेशातील दाव्यांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही न्यायालयांना धमकीचे संदेश मिळाल्याची माहिती असल्याने संबंधित पोलीस यंत्रणा सुरक्षा उपाययोजना करत आहेत. धमकीतील माहितीची सत्यता अद्याप तपासली जात असून, संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.

