दक्षिण मुंबईतील अनधिकृत शाळा व वर्गांवर प्रशासनाचा बडगा; तात्काळ बंद करण्याचे आदेश
मुंबई, दि. १३ : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा आणि शाळांमधील विशिष्ट वर्ग शासनाची आवश्यक मान्यता न घेता सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी संबंधित संस्थांना नोटिसा बजावून अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या शाळा व वर्ग तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण करणे आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता राखणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान काही शाळा संपूर्णपणे विनामान्यता कार्यरत असल्याचे आढळून आले. यामध्ये क्रॉफर्ड मार्केट परिसरातील मदनी हायस्कूल, ताडदेव येथील युसुफ मेहर अली हायस्कूल, धारावी येथील मदर तेरेसा हायस्कूल आणि गणेश विद्यामंदिर, वडाळा पूर्व येथील ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल तसेच गोपाळराव देशमुख मार्गावरील फिनलँड इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. या शाळांना कोणत्याही इयत्तेसाठी अधिकृत मान्यता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय काही शाळांना मर्यादित वर्गांसाठी मान्यता असताना अतिरिक्त वर्ग अनधिकृतपणे सुरू असल्याचेही समोर आले आहे. मस्जिद परिसरातील मोहम्मदीया हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग विनामान्यता चालविले जात असल्याचे आढळले. या शाळेला केवळ इयत्ता पहिली ते पाचवी आणि नववी ते दहावी या वर्गांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच परेल परिसरातील गोल्डन स्पायरल हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे वर्ग अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संस्थेला केवळ इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांचीच मान्यता असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का याची खात्री करावी. शाळेची मान्यता, इयत्तानिहाय परवानगी आणि आवश्यक शासकीय नोंदी यांची पडताळणी केल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू नये. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील अनियमितता रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी अशा संस्थांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संबंधित शाळांनी शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करून अनधिकृत वर्ग तात्काळ बंद करावेत, अन्यथा नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
दक्षिण मुंबई विभागात सुरू असलेली ही मोहीम पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना केवळ मान्यताप्राप्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने तपासणी आणि देखरेख केली जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
