
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने “नटराज : वैश्विक ऊर्जेचे प्रकटीकरण” याविषयावर आयोजित केला परिसंवाद
नटराज हे एक असे शक्तिशाली प्रतीक आहे ज्यामध्ये महादेवाची विश्वाचे निर्माता, रक्षणकर्ता आणि संहारक अशी तीनही रूपे एकवटलेली आहेत आणि त्यातच सर्व भारतीयांचे कालचक्राबद्दलचे आकलन सामावलेले आहे. नटराजाचे शिल्प ही कलेच्या क्षेत्रातली एक अत्यंत मोहक कलाकृती असून आधुनिक युगातील चमत्कार आणि कलेचा उत्तम अविष्कार असलेली ही मूर्ती प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय ठरली. संपूर्ण जगभरातून आलेले प्रतिनिधी या प्रख्यात कलाकृतीतून निर्माण होणारे सौंदर्य आणि एका वेगळ्याच उर्जेची अनुभूती घेण्यासाठी तसेच शिल्पकार स्थापथी यांच्या निर्मितीचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक होते
भारत मंडपम येथे जी २० परिषदेच्या स्थानी नटराजाची मूर्ती उभारण्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने महत्वपूर्ण भूमिका बजावली. नटराजाविषयीची माहिती, विचारमंथन आणि ज्ञान युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात “नटराज : वैश्विक ऊर्जेचे प्रकटीकरण” याविषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. नटराज मूर्तीच्या या नेत्रदीपक कलाकृतीच्या निर्मात्यांचा सत्कारही या कार्यक्रमात झाला.
या परिसंवादाला अतिथी आणि वक्ते म्हणून पद्मभूषण डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम, खासदार पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंग, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र ट्रस्टचे अध्यक्ष रामबहादूर राय, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, अखिल भारतीय ललित कला आणि शिल्प संस्थेचे अध्यक्ष बिमन बिहारी दास, कला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. संजीव कुमार शर्मा, नटराज मूर्तीचे निर्माता, तामिळनाडू येथील स्वामी मलाई येथील राधा कृष्ण स्थापथी, एनजीएमएचे माजी महासंचालक अद्वैत गडनायक, प्रख्यात शिल्पकार अनिल सुतार आणि आयजीएनसीए चे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील रसिक प्रेक्षक आणि कलाप्रेमींव्यतिरिक्त २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.