मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहिमे दरम्यान ३३९ वाहनचालकांची तपासणी
मुंबई, दि. ९: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या अंमलाखाली वाहने चालविली जाऊ नयेत, अपघातांची व अपघाती मृत्यूंची रोखणे या उद्देशाने अशा वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्याकरीता ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 339 वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली.
या मोहिमे अंतर्गत आरटीओ व वाहतूक विभागातील अधिकारी यांनी सायन सर्कल, सुमन नगर चौक, एडवर्ड नगर, अमर महल चौक चेंबूर, एलबीएस रोड घाटकोपर, विक्रोळी, देवनार, मानखुर्द शिवाजी नगर चौक आदी ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली. ही मोहिम 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान सायं 7 ते रात्री 11.30 या दरम्यान राबविण्यात आली. यावेळी दुचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक करणारे हलके वाहन, अवजड वाहन व बसचालकांची तपासणी करण्यात आली.
दारू पिऊन वाहने चालविल्यास निश्चितपणे अपघात होऊन मृत्यूमुखी पडण्याची सर्वात जास्त शक्यता असल्याने वाहनचालकांनी नशेच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेत. पुढील काळातही ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी दारूच्या अंमलाखाली वाहने चालवू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी केले आहे.