नागपूर विभागात ‘राजमाता जिजाऊ’च्या २४ नव्या बसेस दाखल
नागपूर, दि. २७ : राज्य परिवहन सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी एसटी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. “ज्या ठिकाणी अधिकृत बसथांबे आहेत, तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत,” असे स्पष्ट सांगत त्यांनी चालक-वाहकांनी प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे आवाहन केले.
नागपूर विभागात नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. सदर येथील जिल्हा नियोजन भवनात त्यांच्या हस्ते सात बसेसना प्रातिनिधिक स्वरूपात हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत नागपूर विभागात एकूण २४ नव्या बसेस दाखल झाल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुलभ सेवा मिळणार आहे.
पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी एसटी अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून नवीन बसमार्ग आखण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उमरेड, काटोल, सावनेर आणि रामटेक या तालुक्यांमध्ये बससेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच पारडसिंगा, धापेवाडा, रामटेक, कोराडी, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच दुर्गम भागांमध्ये बससेवा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन सर्किट विकसित करून वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.
कार्यक्रमाला आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार आशीष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार संजय मेश्राम, माजी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘राजमाता जिजाऊ’ बसेसची वैशिष्ट्ये:
- एका रांगेत ३+२ अशी आसनरचना
- सुमारे ५५ ते ५६ प्रवासी क्षमता
- ४ सीसीटीव्ही कॅमेरे (आतील व बाहेरील)
- पॅनिक बटन व जीपीएस ट्रॅकिंग सुविधा
- इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले व पीए प्रणाली
- इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम
- सुधारित आसनरचना व आधुनिक डिझाइन
- जास्त गर्दीच्या मार्गांसाठी विशेष तयार
या नव्या बसेसच्या समावेशामुळे नागपूर विभागातील एसटी सेवेची कार्यक्षमता वाढणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
