कथित प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर फिरल्याचा दावा; एमपीएससीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी, तपास सुरू
मुंबई, दि. २७ : राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत कथित पेपरफुटी झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन स्वतंत्र, निष्पक्ष आणि निश्चित कालमर्यादेत चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदनही त्यांनी आयुक्तांकडे सादर केले.
रोहित पवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक १६/२०२५ अंतर्गत २२ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेबाबत विविध तक्रारी, उपलब्ध डिजिटल पुरावे आणि सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या माहितीतून गंभीर गैरव्यवहार झाल्याची शंका निर्माण होत आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी कथित प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे प्रसारित झाल्याचे आरोप आहेत. तसेच सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित प्रश्नपत्रिकेतील मजकूर आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, “१०० पैकी ९० प्रश्न जुळले” आणि “मोबाईलवरून नक्कल” अशा स्वरूपाचे संदेशही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, दि. २० मार्च २०२६ रोजी संबंधित परीक्षेतील प्रश्नांचे छायाचित्र एका उमेदवाराला पाठविण्यात आल्याचा आणि त्या उमेदवाराला परीक्षेत उच्च गुण मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या मनात भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत शंका निर्माण झाल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईपर्यंत संबंधित भरती प्रक्रियेतील नियुक्त्या आणि पुढील कार्यवाही तात्काळ स्थगित करण्यात यावी, तसेच गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात घेऊन परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या विषयावर तुकाराम मुंढे यांनीही भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या माहितीनुसार, संबंधित विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारित येत असल्याने उपलब्ध सर्व कागदपत्रे आयोगाकडे पाठविण्यात येतील. तसेच आयोग या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
एमपीएससीची भूमिका
औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील एका तक्रारदाराने नंतर स्वतः ई-मेलद्वारे कोणतीही तक्रार नसल्याचे आयोगाला कळविले आहे.
तथापि, संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आयोगाकडून रीतसर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कथित गैरव्यवहाराबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहितीही महेंद्र हरपाळकर यांनी दिली.
अलीकडील काळात विविध भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांबाबत पारदर्शकतेचे प्रश्न उपस्थित होत असताना, औषध निरीक्षक भरती परीक्षेवरील हे आरोपही राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहेत. आता आयोगाच्या तपासातून या आरोपांमागील सत्य समोर येणार का आणि भरती प्रक्रियेबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
