Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महावितरण कर्मचार्‍याचा ‘अधिकार्‍यांच्या’ वरदहस्ताने घोटाळा? गृहनिर्माण संस्थेच्या पैशांनी भरले स्वतःच्या घरचे बिल

परिसरातल्या अनेक गृहनिर्माण संस्थांत अशाच प्रकारे अफरातफर केल्याची शंका

आपली समस्या टीम

पनवेल, दि. १८: अभिनेता रितेश देशमुख, परेश रावल व ओम पुरी अभिनीत ‘माला माल वीकली’ चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटात मृत अंथोनी याचे लॉटरीत जिंकलेले पैसे लाटण्यासाठी सबंध गाव मिलीभगत करून लॉटरी इन्स्पेक्टरची फसवणूक करतो. तसाच प्रकार सध्या पनवेल १ उप विभागातील महावितरणचे अधिकारी आपल्या एका कर्मचार्‍याची चोरी लपविण्यासाठी करत असल्याची शंका येत आहे. महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वार्ता कडे पनवेल तालुक्यातील नेरे ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मीनगर मॅग्नोलिया गृहनिर्माण सोसायटी येथे, महावितरण च्या शेखर रंगारी नामक कर्मचार्‍याने सोसायटीची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आली होती. यावेळी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र आमच्या ‘आपली समस्या’ टीम ने तपासली. यानंतर तपशिलात गेल्यावर अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश पडला.

याच संकुलात राहणार्‍या शेखर रंगारी या महावितरण कर्मचार्‍याने एक खोटी कथा रंगवत, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येथील सोसायटीच्या पदाधिकार्‍यांकडे सोसायटीच्या सामाईक वीजबिलातील तूट भरून काढण्यासाठी १५,२८०/- रुपयांची मागणी केली होती. यावेळी तत्कालीन सोसायटी पदाधिकार्‍यांनी कोणतीही शहानिशा न करता या रकमेचा चेक (क्र.१९७७१४ दि.४-०९-२०२०) शेखर कडे सुपूर्द केला. यानंतर या ठगाने जे केलं त्यामुळे नक्कीच राज्याच्या ऊर्जा विभागाची मान शरमेने खाली गेलीय. सोसायटीने दिलेला हा चेक या ठगाने महावितरण च्या अकाऊंट वर टाकला खरा परंतू पनवेल १ उपविभागीय कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या संगनमताने हे पैसे स्वतःच्या आधीच्या घराचे व इतर तीन जणांच्या घरांचे विजबिलाचे पैसे भरण्यासाठी खर्च केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट जाणवतेय.

सविस्तर तपशील 

महावितरण कर्मचार्‍याचा हा प्रताप झाकला गेलाही असता. परंतू मागील हिशोब तपासताना सोसायटीतील एका पदाधिकार्‍याला तफावत आढळल्याने त्यांनी महावितरणकडे याबाबत तपशीलवार माहिती मागविली. ज्यात उत्तरादाखल महावितरणने १५,२८०/- रुपये सोसायटिचे वीजबिल भरण्यासाठी न वापरता हे पैसे ४ वीज ग्राहकांचे वीजबिल भरण्यासाठी खर्च झाल्याबाबत रीतसर खुलासा केला.  या संदर्भात आमच्या टीम ला खोलात शिरल्यावर आढळले की यातील एक बिल हे शेखर रंगारी याच्या आधीच्या भाड्याच्या घराचे आहे ज्या संदर्भात आमच्या टीम ने घरमालकाशी वार्तालाप करत याची खातरजमा केली. या प्रकरणात संबंधित इतर तीन ग्राहकांकडून शेखर रंगारी याने पैसे घेत ते इतर कर्मचार्‍यांच्या संगनमताने आपापसात लाटल्याचे स्पष्ट दिसते आहे. परंतू चेक शी संबंधित खात्याची व ग्राहक क्रमांकांची खातरजमा न करता कोणत्या आधारावर महावितरणच्या लेखा विभागाने हे पैसे परस्पर इतरांच्या खात्यावर जमा केले याचे उत्तर वरिष्ठांना द्यावेच लागेल. सदर घोटाळा झाल्याची बाब पनवेल येथील महावितरण अधिकार्‍यांच्या ध्यानात गेल्या महिन्यात येऊनही त्यांनी अद्याप या प्रकरणी संबंधित कर्मचारी व अधिकार्‍यांवर रीतसर फौजदारी कारवाई करण्यास विलंब लावणे म्हणजे त्यांचाही अशा घोटाळ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा तर नाही ना या शंकेस वाव आहे. विशेष म्हणजे या कर्मचार्‍याची गेल्या काही वर्षांतली प्रगती व राहणीमन डोळे दीपवणारे असल्याचे आमच्या ध्यानात आले.

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र वार्ता ने ‘महावितरण आणि ४० चोर’ नावाची जनहितार्थ अशी एक व्यापक मोहीम आखली होती. या मोहिमेअंतर्गत आम्ही पनवेल-भिंगारी सेक्शन मधील नेरे, चिपळे ग्रामपंचायत हद्दीतील वीजवितरण कर्मचार्‍यांकडून चालणार्‍या घोटाळ्याबाबत लोकांच्या व्यथा महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व ऊर्जा मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यावेळी महालक्ष्मी नगर या जवळपास १२०० घरांच्या गृहसंकुलातील अनेक त्रस्त नागरिकांनी शेखर रंगारी याचे थेट नाव घेत त्याच्याकडून मीटर मध्ये गोलमाल होत असल्याचे गंभीर आरोप केले होते. परंतू महावितरणच्या निगरगट्ट अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ज्यामुळे आज शेखर रंगारी सारख्या एका कनिष्ठ कर्मचार्‍याची हिम्मत वाढली व त्याने घोटाळयांची मालिकाच सुरू केली. शेखर रंगारी सारख्या लोकांच्या पैशांवर डल्ला मारणार्‍या लुटरू कर्मचारी व अधिकार्‍यांना बडतर्फी सोबतच सश्रम कारावासाची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र वार्ताच्या कायदे विभागाने(Legal Team) पनवेल विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकार्‍यांची रीतसर तक्रार संबंधित विभागांना केली आहे.

नवी मुंबई विभागात सध्या अॅंटी करप्शन ब्रांच कडून ज्या विभागांवर सर्वात जास्त कारवाया केल्या जातात त्यात  महावितरण व सिडको यांचा वरचा क्रमांक लागतो. ही निश्चितच या विभागांसाठी भूषणावह बाब नाही. सध्यातरी ‘महावितरण आणि ४० चोर’ या मोहिमेअंतर्गत महावितरण सारख्या देशातील उत्कृष्ट संरचना असलेल्या सरकारी आस्थापनाला लागलेली कीड मिटवण्याकामी महाराष्ट्र वार्ता तत्पर राहील.

भ्रष्ट सरकारी कर्मचार्‍यांच्या घोटाळयांबाबतची माहिती/तक्रार देण्यासाठी आपण आपली समस्या टीम ला 9372236332 या क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे व news@maharashtravarta.com ला ई-मेल द्वारे संपर्क करू शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *