Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून संरक्षण कसे करावे

जाणून घ्या पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून संरक्षण कसे करावे

दरवर्षी सातत्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जगामध्ये जवळपास पाच कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होता. भारतातही हा रोग मोठ्याप्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यूसुद्धा होतो. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाची साथ पावसाळ्यात जास्त प्रमाणात होते.

हा रोग विषाणून्य रोग (अरबो व्हायरस) आहे. डेंग्यु विषाणुचे डेंग्यू -१, डेंग्यू -२, डेंग्यू -३, व डेंग्यू -४ असे चार प्रकार आहेत.

प्रसार – या रोगाचा प्रसार दूषित एडीस इजिप्ती नावाची मादी डास चावलेल्यामुळे निरोगी व्यक्तीला डेंग्यू रोग होतो. डेंग्यू विषाणूयुक्त डास मरेपर्यंत दुश्चित राहून अनेक व्यक्तींना चावून या रोगाचा प्रसार करतो. डासाच्या शरीरात डेंग्यू विषाणूची वाढ साधारणत ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. या रोगाचे प्रसारक एडिस इजिप्ती डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यात उदा. रांजण, माठ, कुलर्स, पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तू, नारळाच्या कुरवंट्या, टायर, इ. मध्ये पैदा होतात. हे डास दिवसा चावतात. या डासांच्या पायांवर काळे पांढरे रिंग असतात, म्हणून या डासांना टायगर मॉस्कयुटो सुद्धा म्हणतात.

एडिस इजिप्ती डासाची वाढ चार प्रकारामध्ये होते. उदा. अंडी, अळी कोष, डास. अधिशयन काळ ५ ते १० दिवसांचा आहे.

आजाराची लक्षणे

डेंग्यू ताप – एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र, डोके दुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोळे दुखणे, अशक्तपणा भूक मंदावणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे.

रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप (डेंग्यू हिमोरेजिक फिवर)

डेंग्यू तापाची वरीलप्रमाणे लक्षणे आढळून येतात. त्वचेखाली रक्तस्त्राव होणे. नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे. रक्तस्त्रावयुक्त डेंग्यूताप बहुतांशी १५ वर्षाखालील मुलांना होतो. मोठ्या व्यक्तींनाही होऊ शकतो.

डेंग्यू शॉक सिंड्रोम – डेंग्यूमध्ये जेव्हा रुग्ण बेशुद्ध होतो त्याला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

रोग निदान

रक्तजल नमुना तपासणी – रक्तजल चाचणी सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद (घाटी) येथे तपासणी करून निश्चित रोगनिदान होते.

उपचार – या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिशय घाम येणे, वारंवार उलट्या होणे, जिभेला कोरड पडणे अशा परिस्थितीत ओ.आर.एस (मीठ, साखर पाणी) द्रावणाचा वापर करावा.

दक्षता – टॅब ॲस्परीन ब्रुफेन आदी औषधी देऊ नयेत. वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली औंषधोपचार घेणे, रक्तस्त्रावयुक्त डेंगयूताप (डेंग्यु हिमोरेजिक फिवर) व डेंग्यू शॉक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना :-

१)      सर्व्हेक्षण :- किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करुन हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स, ब्रॅटयु इंडेक्स काढण्यात येऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते. प्रत्यक्ष सर्व्हेक्षण अंतर्गत रक्त नमुने व रक्तजल नमुने घेऊन रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यात येतो.

२)      डास अळी व डास नियंत्रण :- डास अळी नियंत्रण ही सर्वात महत्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यू व चिकुनगुनियाचे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालता.

३)      डासोत्पती स्थाने- पावसाळ्यात साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या इत्यादी.

४)      डासोत्पती स्थाने नष्ट करण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणी साठे रिकामे करुन कोरडा दिवस पाळण्यात यावा.

५)      साचलेली डबके व नाल्या वाहत्या कराव्यात, खड्डे बुजविण्यात यावेत. शक्य नसल्यास या पाण्यावर आठवड्यातून एकदा रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकण्यात यावे.

६)      ॲबेटींग – आरोग्य विभागामार्फत घरातील सांडपाण्याचे रिकामे न करता येणारे पाणीसाठ्यात योग्य प्रमाणात ॲबेटींग केले जाते.

७)      मच्छरदाणीचा वापर करण्यात यावा.

८)      जैविक उपाय योजना– डासोत्पती स्थानात गप्पीमासे सोडण्यात येतात. हे मासे डासांच्या अळ्या खातात. सर्व आरोग्य संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात.

९)      धूर फवारणी- उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते. आठवड्याच्या अंतराने दोनदा केली जाते.

आरोग्य संदेश – १) घरातील पाणीसाठे आठवड्यात एकदा रिकामे करुन घासूनपुसून कोरडे करुन घ्यावे. २) डासांपासून स्वत:चे रक्षण करण्यात यावे. याकरिता डास प्रतिबंधात्मक कॉईल, वड्या, क्रिम, मच्छरदाणी, संपुर्ण अंगावर कपडे घालणे. ३) आपला परिसर स्वच्छ ठेवा. ४) आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

“ डंख छोटा, धोका मोठा ” – म्हणून परिसर स्वच्छ ठेवा, आपले आरोग्य जपा.

 

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *