पत्रकार परिषद, माध्यम स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांवरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा टीका
मुंबई, दि. २० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. इटली दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटरेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीनंतर “ओह माय फ्रेंड मेलोनी” या उल्लेखावरून संजय राऊत यांनी मोदींची मिमिक्री करत टीकास्त्र सोडले.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात, भारताला उपदेश करतात काटकसर करा वगैरे आणि स्वतः जात आहेत. सात देशात नॉर्वे, इटली, स्वीडन, नेदरलँड तुम्ही गेलेला आहात आणि तिकडल्या पत्रकारांनी जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जाता. नॉर्वेचे पत्रकार यांनी भारताचा उल्लेख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे आपण पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला आणि मोदी पळताना दिसत आहेत. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे.”
राऊत यांनी पुढे माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित केला. “मोदींनी भारतात गेल्या बारा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी जगभरात फिरले पण जगात जाऊन देखील कुठलाही पत्रकारांची वार्तालाप केला नाही. लोकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे देणार नसाल, जगभरातील देशातील लोकशाही अत्यंत संकटात आहे. हे जगाला माहिती आहे. भारतामध्ये मानवी अधिकारांच्या उल्लंघनाच्या घटना घडत आहेत. गुजरातच्या तुरुंगात किती निरपराध लोक अडकून पडले आहेत,” असेही त्यांनी म्हटले.
भारताच्या जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकातील घसरणीबाबत बोलताना राऊत म्हणाले, “आपला भारत १५७ क्रमांकावर का गेला? याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत. एकेकाळी भारत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या क्षेत्रात वरच्या स्थानावर होता. बोलण्याचा, लिहिण्याचा, ऐकण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार आज धोक्यात आला आहे. स्वातंत्र्य आणि मानवी अधिकारांच्या उल्लंघनामुळेच भारत या क्रमांकावर पोहोचला आहे.”
नॉर्वेमधील एका महिला पत्रकाराने मानवाधिकार उल्लंघनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरूनही राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. “पंतप्रधान जगभरात फिरतात, लोकांना काटकसर करण्याचा उपदेश करतात. पण परदेशात गेल्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे न जाता पळून का जातात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख करताना राऊत म्हणाले, “पंतप्रधान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘ओह माय फ्रेंड मेलोनी’ म्हणतात. मेलोनी त्यांची फ्रेंड आहे, पण ती नॉर्वेची पत्रकार त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. इतकेच काय, या देशातील जनता आणि पत्रकारही त्यांचे मित्र होऊ शकले नाहीत.”
भारतातील पत्रकारांबाबत बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. “जर भारतात एखाद्या पत्रकाराने असे धाडस दाखवले असते, तर त्याला थेट राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले असते आणि त्या वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्राचे लायसन्स रद्द केले असते,” असे राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचे समर्थन केल्याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी असहमती दर्शवली. “आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मोदींनी उत्तर दिलेच पाहिजे. मग इंदिरा गांधी यांच्याशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान देखील परदेशात जात होते. ते माध्यमांच्या प्रश्नांपासून कधीही पळाले नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही स्वतःपासून पळत आहात, तुम्हाला काहीतरी लपवायचे आहे आणि ज्यांना लपवायचे आहे तेच पळतात. हा विषय शरद पवार साहेबांचा नाही. हा विषय नरेंद्र मोदींचा आहे. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारे पळ काढू नये. जो बारा वर्ष देशाचे नेतृत्व करतो, लोकशाहीचा डंका वाजवतो, निवडणुका लढवतो, सत्तेवर येतो, जगभरात फिरतो, स्वतःला विश्वगुरू मानतो, त्या व्यक्तीने प्रश्नांवर बोलले पाहिजे.”
समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे आणि त्यानंतर झालेल्या राजकीय प्रतिक्रियांमुळे हा दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
