दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ मोहिमेद्वारे राज्यभर कठोर नियम लागू
मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दूध उत्पादक, संकलन केंद्रे, प्रक्रिया उद्योग, विक्रेते आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांसाठी नव्या नियमावलीची घोषणा केली. यावेळी ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही जनजागृती मोहीमही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात अन्नभेसळीविरोधात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू असून, विशेषतः दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत भेसळ, दिशाभूल करणारी माहिती, चुकीचे लेबलिंग आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दूध सीलबंद नसेल तर खरेदी करू नका : तुकाराम मुंढे
पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे म्हणाले, “दूध जर सील बंद नसेल तर ते कोणीही घेऊ नये. सुट्या स्वरूपात दूध विकता येणार नाही, लूज मिल्क मधून विकता येणार नाही. रॉ मिल्क असेल तर त्यावर ते कच्च आहे ते उकळून प्यावे असा लिहावं लागेल. रॉ मिल्क विक्री बंद आहे का? तर नाही ती विहित अटींच्या अधीन राहील. सिंथेतीक मिल्क म्हणजे अस्सल दूध नसून रासायनिक पदार्थ वापरून तयार केलेले भेसळयुक्त उत्पादन आहे. भेसळ केल्यास किंवा नियम मोडल्यास विविध स्तरावर कारवाई केली जाणार आहे.”
सुट्टे दूध घेताना शेतकऱ्याची खात्री करा
तुकाराम मुंढे म्हणाले, “अनेक ठिकाणी सुट्ट्या दुधात भेसळ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुट्टे दूध घेताना नागरिकांनी काळजी घ्यावी. तो दूध विकणारा खरोखरच शेतकरी आहे का हे पाहावं. कारवाई सुरू केल्यापासून रस्त्याच्या कडेला दूध विकणारे बरेचजण कमी झाले आहेत.”
खोट्या जाहिरातींवर दहा लाख रुपयांपर्यंत दंड
याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “खोटी जाहिरात केली तर दहा लाख रुपयांपर्यंत दंड लावण्यात येईल. आतापर्यंत आम्ही कमी दंड लावत होतो, आता मात्र दहा लाख रुपयांपर्यंत दंड लावू.”
शाळांच्या परिसरासाठी स्वतंत्र नियमावली
शाळा व महाविद्यालय परिसरातील अन्नपदार्थ विक्रीबाबतही लवकरच स्वतंत्र आदेश जारी केले जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ते म्हणाले, “आता शाळा महाविद्यालय जवळ काय विकावं काय विकू नये? पाचशे मीटर अंतरावर आम्ही आधीच आदेश दिलेले आहेत. हे एनर्जी ड्रिंक सुद्धा ते विकू शकत नाहीत. जशी आज दुधाच्या भेसळ संदर्भात जे आदेश दिले तसे आम्ही शाळांसाठी किंवा शाळा परिसरात काय विकलं जावं, जाऊ नये याबाबत सुद्धा आदेश काढणार आहोत. शाळेत जिथे ट्रेनिंग होते तिथे सुद्धा आम्ही हे सांगत आहोत.”
‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ मोहिमेची घोषणा
नवीन मोहिमेबाबत माहिती देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “आता आपण सेव्ह फूड, सेव्ह ड्रग ही मोहीम हाती घेतली आहे. आपल्या अन्नातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे दूध. दुधातील भेसळ, कृत्रिम दूध या सगळ्या संबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दूध उत्पादकांपासून पॅकर्स आणि विक्रेत्यांपर्यंत आठ प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत. दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज आणि आईस्क्रीम विक्रेते या सर्वांना हे नियम लागू असणार आहेत.” गुटखा विक्रीबाबत त्यांनी सांगितले, “गुटख्यावर बंदी आहेच. कुठे त्याचा वापर होत असेल तर माहिती द्या. कुठे चुकीचा प्रकार आढळला तर कारवाई करू.”
आईस्क्रीम, कुल्फी आणि चॉकलेटसाठीही स्पष्ट माहिती आवश्यक
दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत त्यांनी स्पष्ट केले, “आईस्क्रीम, कुल्फी, चॉकलेट याबाबत देखील स्पष्ट गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. कोणताही स्टार्च किंवा नॉन मिल्क पदार्थ त्यामध्ये वापरला असेल तर त्याबाबतची माहिती देणं बंधनकारक राहणार आहे.” शीतकरण केंद्रांबाबत तुकाराम मुंढे म्हणाले, “स्वच्छता असायला हवी, तापमान मेंटेन करायला हवं, सांडपाण्याची व्यवस्था देखील करणं गरजेचं आहे.”
‘प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न देणे हेच आमचे मिशन’
राज्याच्या अन्न सुरक्षा धोरणाबाबत ते म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न देणं हेच आमचं मिशन आहे. शुद्ध, सकस दूध द्यायचं आहे. त्यासाठी आपण एक सक्षम व्यवस्था विकसित करत आहोत.”
जनजागृतीलाही तितकेच महत्त्व
नागरिकांच्या सहभागाबाबत तुकाराम मुंढे म्हणाले, “भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागृती होणं हा आहे. लोकांना समजलं पाहिजे की त्या पदार्थामध्ये कोणकोणते घटक आहेत. त्याची एक्सपायरी डेट काय आहे याबाबतची माहिती घ्यावी.”
राज्यभर तपासणी मोहीम अधिक तीव्र
अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीवर नियमित तपासणी केली जाणार आहे. भेसळ, चुकीचे लेबलिंग, अस्वच्छ प्रक्रिया, खोटी जाहिरात किंवा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही प्रकारावर अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनीही केवळ अधिकृत, सीलबंद आणि नियमांनुसार विक्री होणारे अन्नपदार्थ खरेदी करून संशयास्पद प्रकारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
