“‘बी.एससी. नर्सिंग’च्या रिक्त जागा भरण्यासाठी शासन सज्ज; प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर” – मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. २० : राज्यातील ‘बी.एससी. नर्सिंग’ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही पात्र विद्यार्थ्याला अन्याय होऊ नये, तसेच सर्व जागा गुणवत्ताधारित आणि पारदर्शक पद्धतीने भरल्या जाव्यात, यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या नियमांनुसार आणि पात्रता निकषांनुसार संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेशासंदर्भातील माहिती पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘बी.एससी. नर्सिंग’ अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेतील बदलासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्यासह संबंधित अधिकारी, महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि संस्था चालक उपस्थित होते.
राज्यात सध्या जवळपास ३०० ‘बी.एससी. नर्सिंग’ महाविद्यालये कार्यरत असून, मागील शैक्षणिक वर्षात सुमारे पाच हजार जागा रिक्त राहिल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, पात्रता निकष, विद्यार्थ्यांची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यांसारख्या मुद्यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची गरज सातत्याने वाढत असून, भविष्यातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने नर्सिंग शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, अर्ज प्रक्रियेमध्ये सुलभता यावी आणि ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत आहे.
बैठकीत ‘बी.एससी. नर्सिंग’ प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेमध्ये काही बदल करण्याबाबत चर्चा झाली असून, विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. प्रवेश प्रक्रियेमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमधील रिक्त जागा कमी करण्यासाठी माहिती प्रसार, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करणे आणि संस्थांशी समन्वय वाढवणे यावर विशेष भर दिला जात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सीईटी सेलमार्फत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अधिक प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न सुरू असून, विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रातील वाढती मागणी, ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांचा विस्तार आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता, राज्य शासन नर्सिंग शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी पुढील काळात विविध धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
