प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित
मुंबई, दि. २४ जून : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आर्थिक दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले असून एकूण ४० लाख रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
तांदुळवाडी येथे पंढरपूर-सातारा मार्गावर प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या अपघाताने संपूर्ण राज्याला हादरा बसला होता. दुर्घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य तातडीने राबविण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.
या अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६५), पूजा अमोल सातुरे (वय २३), पूजाव बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), भारव अमोल सातुरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा या दुर्घटनेत बळी गेल्याने परिसरात शोककळा पसरली होती.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. शासनाकडून प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मदतीची रक्कम वितरित करण्यात आली.
शासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या प्रत्येक वारसाला ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित कुटुंबीयांना देण्यात आले आहे. या मदतीमुळे दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाने आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून विविध प्रकारची आर्थिक मदत देण्याची भूमिका कायम ठेवली असून तांदुळवाडी दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने मदत आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून प्रभावित कुटुंबांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचा संदेश या मदतवितरणातून देण्यात आला आहे.
