२९ जूनपर्यंत अर्जाची संधी
मुंबई, दि. २४: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य अधिक सक्षम करणे, भावनिक आधार व्यवस्था मजबूत करणे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची उपलब्धता वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांनी महत्त्वाकांक्षी ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हा उपक्रम महत्त्वाची संधी मानला जात असून, पहिल्या प्रशिक्षण बॅचसाठी इच्छुक उमेदवारांना दि. २९ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
मानसिक आरोग्याविषयी वाढती जागरूकता, विद्यार्थ्यांमधील ताणतणाव, भावनिक आव्हाने आणि समुपदेशन सेवांची वाढती गरज लक्षात घेऊन हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही राज्य शासनाची अग्रगण्य संस्था तांत्रिक आणि शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे.
मानसिक आरोग्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश
या प्रशिक्षणामध्ये मानसिक आरोग्याची मूलतत्त्वे, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, प्रभावी संवाद कौशल्ये, सक्रिय ऐकण्याची पद्धत, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आधुनिक काळातील मानसिक आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक संधींसाठी आवश्यक मान्यता मिळणार आहे.
प्रशिक्षणाची रचना बहुआयामी
या कार्यक्रमाचा पहिला टप्पा पुणे येथे १५ दिवसांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा असेल. यामध्ये संवादात्मक सत्रे, प्रकरण अभ्यास, प्रत्यक्ष उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
यानंतर प्रशिक्षणार्थींना एक महिन्याचे क्षेत्रीय प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत प्रत्येक उमेदवाराला जिल्हास्तरावरील एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयाशी जोडले जाईल, जेणेकरून प्रत्यक्ष समुपदेशन कार्याचा अनुभव मिळू शकेल.
त्यानंतर ३ ते ५ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमार्फत नियमित मार्गदर्शन, निरीक्षण, ऑनलाइन सत्रे, मेंटरिंग आणि व्यावसायिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

तज्ज्ञांकडून प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन
संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेतील अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. याशिवाय अमृतच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांकडूनही वेळोवेळी अनुभवाधारित मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही सहभागी उमेदवारांसाठी नियमित ऑनलाइन सत्रे, प्रकरण चर्चा, सुपरव्हिजन, मेंटरिंग तसेच प्रत्यक्ष कामातील अडचणींचे निराकरण यांसारख्या सुविधा उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक कौशल्यांचा सातत्याने विकास होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत उपक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व्यवस्था निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे. ‘अमृत मानस मित्र’ हा उपक्रम या धोरणातील उद्दिष्टांना पूरक ठरणारा मानला जात आहे.
रोजगार आणि करिअरच्या विविध संधी
या प्रशिक्षणाद्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतील. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, समुपदेशन केंद्रे आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच व्यावसायिक नेटवर्किंगची संधीही सहभागी उमेदवारांना मिळणार आहे.
पात्रता निकष
या प्रशिक्षणासाठी खालीलपैकी कोणतीही पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात :
- एम.ए. किंवा एम.एस्सी. मानसशास्त्र
- एम.ए. किंवा एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र
- मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू)
मानसिक आरोग्य किंवा समुपदेशन क्षेत्रातील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रशिक्षण मोफत; निवास व भोजनाचा खर्च स्वतःचा
अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र प्रशिक्षणादरम्यान राहण्याची, निवासाची आणि भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर ओरिएंटेशन सत्र, मुलाखत किंवा आवश्यक मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली जाईल. पात्रता, अनुभव आणि प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य या निकषांनुसार अंतिम निवड केली जाणार आहे.
अर्जासाठी अंतिम मुदत
पहिल्या प्रशिक्षण बॅचसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. २९ जून २०२६ निश्चित करण्यात आली असून, मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित संस्थेकडून करण्यात आले आहे.
