Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मराठीची गळचेपी करणाऱ्या व शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या शाळा व्यवस्थापना विरुद्ध पालक करणार धरणे

वाशी स्थित ‘आयसीएल’ ICL शाळा व्यवस्थापनाकडून मराठी माध्यमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नवी मुंबई, दि.१४: RTE-2009 च्या कायद्यान्वये शासनाच्या निर्णय क्र.आरटीई-2013/प्र क्र 20/प्रा शी 1, दिनांक 31 डिसेंबर 2013 मधील प्रस्तावनेनुसार आणि कलम 14(1)नुसार प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतुद आहे. त्यान्वये कोणत्याही इयत्तेत विद्यार्थ्यांना नवे प्रवेश देण्याची तरतुद असून कोणतीही अनुदानीत अथवा विना अनुदानित शाळा संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा कायदा असतांना केवळ विद्यार्थी शाळेची फी भरत नाहीत, शाळेत बसण्याची व्यवस्था नाही आणि “कोरोना”चा प्रादुर्भाव अशी थातुरमातुर कारणे सांगुन मराठी माध्यमांचे प्रवेश बंद करायचे आणि बक्कळ पैसा कमवण्यासाठी इंग्रजी माध्यमांचे प्रवेश मात्र चालु ठेवायचे हा प्रकार म्हणजे सरळसरळ मराठीलाच नामशेष करण्याचे षडयंत्र आहे. आणि असे हे षडयंत्र रचलंय नवी मुंबईतील वाशीस्थित आयसीएल हायस्कूल च्या शाळा व्यवस्थापन कमिटी ने.

हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्याने पालकांनी सदर शाळेच्या मुख्याध्यापिका राव मॅडम यांच्याशी प्रवेशाबाबतीत चर्चा केली असता कोरानाच्या प्रादुर्भावामुळे नवीन प्रवेश बंद केले असल्याचा फलकच शाळेच्या प्रवेशद्वारापाशी लावत आपला इरादा व्यक्त केला. हा फलक पाहुन गेली दोन वर्षे आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून वाट पहात असतांना अचानक संस्थेने प्रवेश बंद चा निर्णय घेतल्याने पालक वर्ग काळजीत पडला आहे. आता मुलांचे अॅडमिशन कसे होणार? याचा खुलासा करण्यास पालक शाळेत गेले असता राव मॅडम यांनी पालकांना उडवा-उडवीची व न पटणारी कारणे दिली. त्यामुळे पालकांनी शाळेच्या गेटवर मुलांना सोबत घेऊन रितसर पोलिसांच्या परवानगी ने २९ जून रोजी आंदोलन केले.

या वेळीही शाळेने व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून पालकांनीच आपले एक तात्पुरते शिष्टमंडळ बनवुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी स्वाती तिराडकर यांना भेटून निवेदन दिले. त्यावर तत्काळ शिक्षणाधिकारी तिराडकर यांनी शाळेला पत्र पाठवून प्रवेश बंद करण्याचे लेखी कारण ७ दिवसात देण्याचे आदेश दिले. त्यालाही वाटाण्याचे अक्षता लावत शाळेने पालकांच्या शिष्टमंडळाला काहीही कळवले नाही. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या ७ दिवसांच्या मुदती नंतर पालकांनी पुन्हा शाळेच्या व्यवस्थापन कमिटी ची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट मिळाली नाही. तब्बल ३ तास गेटवर वाट पाहील्यानंतर राव मॅडम घरी जाण्यासाठी निघाल्या असतांना गेटवरच पालकांनी त्यांना प्रवेशाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही लवकरच प्रवेश चालु करणार आहोत. तसे शिष्टमंडळाला अगोदरच कळवले जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर पालकांच्या आशा पल्लवित झाल्या.

परंतु शाळेने शिष्टमंडळाला किंवा कोणाही पालक प्रतिनिधींना न कळवता परस्पर गुपचुप पालकांना फोन करुन प्रवेशासाठी बोलवले. आणि फक्त २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. मुळात एकूण ६० ते ७० विद्यार्थ्यांची नोंद पालकांनी केली आहे. ह्या यादीनुसार सर्व मुलांना प्रवेश मिळणे अपेक्षित असतांना फक्त २० च मुलांना प्रवेश दिल्याने प्रवेश न मिळालेल्या पालकांनी पुन्हा शाळेच्या व्यवस्थापन कमिटीची भेट घेतली तर राव मॅडम यांनी सरळसरळ संस्थेवर जबाबदारी ढकलुन आम्ही फक्त २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देऊ शकतो. तसा आम्हाला वरून आदेश मिळाला आहे. तुम्ही इथे येऊ नका, तुम्हाला काय करायचे ते करा, कुठेही अॅडमिशन घ्या पुन्हा इथे येऊ नका. तुम्ही शाळेची फी पण भरत नाही मग आम्ही आमच्या खिशातून लाईटबिल आणि इतर खर्च करायचे काय?

अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पालकांनी आता अॅडमिशनसाठी, मराठी माध्यम वाचवण्यासाठी आणि पालकांशी ऊर्मटपणे वागणाऱ्या राव मॅडम यांची हकालपट्टी करण्यासाठी शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर (पामबीच रोड) सकाळी ११ वाजता आपल्या बायका मुलांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. ह्या आंदोलनाला लोकसेवा अधिकार NGO समितीचे अध्यक्ष बाळक्रुष्ण खोपडे आणि इतर पक्षियांनी पाठींबा देणार असल्याची माहीती आयसीएल शाळा पालक संघटनेचे पालक प्रतिनिधी नरेंद्र वैराळ यांनी दिली असुन शिष्टमंडळामधील प्रतिनिधी अनिल घाणेकर, गोविंद जोशी, संतोष माने, दिलीप गजभरे, मनाली आंब्रे, सुनिता सादये, माधुरी देसाई, कमल पाटील, माधवी शिंदे, सुनिता पिटकर आणि इतर पालकांनी जो पर्यंत सर्व मुलांना प्रवेश मिळत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन असेच चालु ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *