Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आम्ही मतदान का करावे? नेरे-पनवेल येथील महालक्ष्मी नगरवासीयांचा सर्वपक्षीय उमेदवारांना खडा सवाल ?

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत त्रस्त सदनिकाधारकांच्या समस्यांकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण

पनवेल, दि. १६: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. पनवेल Panvel तालुक्यातील नेरे Nere ग्रुप ग्रामपंचायतीतही अशाच स्वरूपाचं वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नेरे व लगतची गावे या न त्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिली आहेत. या संदर्भात महाराष्ट्र वार्ता ची टीम वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून परिसरातील प्रदूषण, विकासकांकडून होणारी फसवणूक, महावितरण चा भ्रष्ट कारभार आदि समस्यांबाबत वाचा फोडत आलेली आहे. परंतु, लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पुढारी असे महत्वाचे प्रश्न हाती घेऊन प्रशासनसोबत लढताना दिसत नाहीत अशी येथील सामान्य मतदाराची भावना आहे. याला आधार देणारी अनेक उदाहरणे देता येतील परंतु तूर्तास या बातमीच्या माध्यमातून विकासक (बिल्डर) अनिश मेहता विकसित महालक्ष्मी नगर Mahalaxmi Nagar या महाकाय संकुलातील नागरिकांना भोगाव्या लागणार्‍या नरक यातनांबाबत चर्चा करणे योग्य ठरेल.

पनवेल तालुक्यातील नेरे ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी डेव्हलपर्स Mahalaxmi Developers कृत महालक्ष्मी नगर या ८०० हून अधिक घरांच्या गृहनिर्माण संकुलातील नागरिकांना सध्या विकासकाने वचनपूर्ती न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय. जवळपास ४० एकर परिसरात पसरलेला हा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास अनिश मेहता Anish Mehta यांच्या महालक्ष्मी डेव्हलपर्स ने २००८ साली सुरुवात केली. २०१० सालापासून टप्प्याटप्प्याने विकासकाने येथील घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात या न त्या कारणामुळे विकासक आणि महालक्ष्मी नगर संकुल सतत चर्चेत राहिले. कधी बसेसच्या अडचणी तर कधी अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे. अद्यापही महालक्षी डेव्हलपर्सने ठरल्याप्रमाणे क्लब हाऊस व स्विमिंग पूल बांधून दिलेले नाही. परंतु, हे झालं हिमनगाचं एक टोक. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या एवढ्या मोठ्या सोसायटीत प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे तो अंदाजे फक्त ४ मीटर रुंदीचा रस्ता. हे ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल; पण हो हीच वस्तुस्थिती आहे. महालक्ष्मी शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ या विकासकाने कलेक्टर मंजूर प्लान प्रमाणे बांधकाम न करता याच जागेच्या बाजूला असलेल्या गवते नामक जमीन मालकाची जमीन विकत घेण्याचे फक्त खोटे आश्वासन देत काही वर्षे तिचा नुसताच वापर केला. अखेर ६ वर्षांपूर्वी गवते यांनी कोर्टाचं दार ठोठावत आपली जमीन ताब्यात घेत ती खणून त्याला कुंपण घातलं. कायद्याप्रमाणे ती त्यांची स्वतःची संपत्ती असून त्या ठिकाणी ते काहीही करण्यास मोकळे आहेत. परंतू या सार्‍या घटनाक्रमानंतर महालक्ष्मी नगर कॉम्प्लेक्स मधील रहिवाश्यांच्या नरकयातनांना खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. या एवढ्याशा वाटेतून फक्त एकावेळी एकच चारचाकी वाहन जाऊ शकते. शिवाय ही वाटही आता खड्डेयुक्त झाली आहे. अधिक खोलात शिरल्यावर असे कळले की सदर प्रवेशद्वाराजवळ लागून असलेल्या शॉपिंग मॉल च्या अनधिकृत बांधकामाने हा रस्ता गिळला आहे. इतर समस्यांच्या जोडीने या एका अति गंभीर समस्येमुळे इथल्या घरांच्या किमतींनी तळ गाठला आहे.

या संकुलातील घरांचा दर्जा हा तसा म्हटला तर बरा आहे. पण या एका समस्येमुळे इथल्या घरांच्या किंमती विभागातील इतर घरांच्या किमतीच्या मानाने घसरलेल्या आहेत. महालक्ष्मी नगर ला अगदी खेटून असलेल्या ‘सत्य दीप’ या गृहनिर्माण संकुलात आजमितीला १ बीएचके चा दर ३० लाख रुपये आहे तर महालक्ष्मी नगर येथील १ बीएचके घराचे दर रुपये २२ लाखांपर्यंत घसरले आहे. याला सर्वस्वी जबाबदार बिल्डर अनिश मेहता आणि महालक्ष्मी नगर गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारिणीतील (कमिटी) सदस्य आहेत. येथील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की विकासकाने मंजूर आराखड्याप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम न करता रस्त्याच्या जागेत अतिक्रमण केलं व बाजूच्या गवते यांची जागा वार्षिक तुटपुंज्या भाड्यापोटी ताब्यात घेतली होती. मुळात एवढा मोठा घोटाळा येथे चालू असताना या प्रकल्पाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताबा प्रमाणपत्र कोणत्या आधारावर दिले गेले हे याचे मोठे कोडेच आम्हाला पडले आहे. शिवाय या काळात सदर ठिकाणी असलेली फेडरेशन म्हणजेच येथील सर्व छोट्या-छोट्या सोसायट्यांचा एकत्रित कारभार पाहणारी महासोसायटी व तिचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर पदाधिकारी-सदस्य गप्प का होते? या काळात त्यांनी प्रशासनाकडे तक्रार का नाही दाखल केली? एकदाही कोर्टाचे दार का नाही ठोठावले? विकासकाकडून सोसायटी हस्तांतरित करवून घेताना अर्धवट राहिलेली कामे का करवून घेतली नाहीत? हे व असे अनेक अनुत्तरित प्रश्न महालक्ष्मी नगर संकुलातील नागरिकांना पडले आहेत. आज या सर्व मंडळींच्या नाकर्तेपणाची शिक्षा येथील सदनिकाधारकांना भोगावी लागत आहे.

मुळात सदर अनधिकृत बांधकामाच्या पार्श्वभूमीवर विकासक अनिश मेहता व महालक्ष्मी नगर डेव्हलपर्स वर एमआरटीपी अॅक्ट १९६६ च्या ५३(१), ५४(१) अंतर्गत तसेच सदनिकाधारकांना सदनिका विकत घेताना दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याबदल महाराष्ट्र सदनिका मालकी कायदा (मोफा) अंतर्गत कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, तसे काही झाले नाही. शिवाय या घोटाळेबाज बिल्डर अनिश मेहता याने येथील सोसायट्यांचे गठन करताना स्वतःच्या खर्चाने अभिहस्तांतरण म्हणजेच कोन्वेयन्स डीड करत मूळ जागा नियमाप्रमाणे गृहनिर्माण संस्थेच्या म्हणजेच लोकांच्या नावावर करणे गरजेचे होते. बिल्डर ची एवढे घोटाळे करण्याची मजल जाण्याला महालक्ष्मी नगर येथील विविध सोसायटयांच्या अध्यक्ष, सचिव आदींचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. या सार्‍या लढाईत विविध राजकीय पक्षांकडून आतापर्यंत फक्त गाजर दाखवण्याचं काम झालंय असा इथल्या रहिवाश्यांचा थेट आरोप आहे. निवडणुका जवळ आल्या की मतांचा जोगवा मागणार्‍या उमेदवाराकडून काही रुपयांची पाकीटं वाटली जातात पण त्यापेक्षा त्यांनी येथील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे जर रीतसर पाठपुरावा केला तर बरे होईल. पण लोकनिधींकडून होणारा हा पाठपुरावा प्रामाणिक हवा, नाहीतर एका बाजूला बिल्डर च्या विरोधात आपण लढतोय असा देखावा निर्माण करायचा आणि दुसरीकडे त्याच्याकडून पैशांची पाकीटं घ्यायची असले उद्योग करून चालणार नाही. ही मतदारांसोबत लबाडी ठरेल. येत्या रविवारी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी होणार्‍या मतदानाचे निकाल जे लागायचे असतील ते लागतील परंतु, विजयी उमेदवारांकडून जर अपेक्षापूर्ती होणार असेल तर मतदानास जाण्यास अर्थ आहे अन्यथा नोटा चा पर्याय उपलब्ध आहेच. या सार्‍या पार्श्वभूमीवर सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले सर्वपक्षीय उमेदवार या समस्यांबाबत नेमका काय विचार करतात हे समोर येणे नक्कीच औत्स्युक्याचे ठरेल.

प्रदूषण, अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 88503 03463 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी संपर्क करू शकता.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *