Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रात लम्पी चर्म रोगाचा घटता आलेख

महाराष्ट्रात लम्पी चर्म रोगाचा घटता आलेख

मुंबई, दि. ३० : राज्यात पशुधनाच्या लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावांची आणि बाधित पशुधनातही घट होत असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

सिंह म्हणाले, सुमारे ७० टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून येतो.

महाराष्ट्रात दि. २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील १९१, अहमदनगर जिल्ह्यातील १२३, धुळे जिल्ह्यात २५, अकोला जिल्ह्यात २०९, पुणे जिल्ह्यात ८३, लातूर मध्ये १३, औरंगाबाद ३५, बीड ३, सातारा जिल्ह्यात ९१, बुलडाणा जिल्ह्यात १४७, अमरावती जिल्ह्यात १५५, उस्मानाबाद ४, कोल्हापूर ७७, सांगली मध्ये १५, यवतमाळ २, सोलापूर १२, वाशिम जिल्ह्यात १३, नाशिक ४, जालना जिल्ह्यात १२, पालघर २, ठाणे १६, नांदेड १०, नागपूर जिल्ह्यात ३, हिंगोली १, रायगड ४, नंदुरबार ५ व वर्धा २ असे एकूण १ हजार २५७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. उपरोक्त बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले आहेत. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य  लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. या बाबत खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

लम्पी चर्म रोगाबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय/जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय  कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा.

तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४(१) नुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ही माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. गांवस्तरावरून अशी माहिती संबंधीत ग्रामसेवक आणि सरपंचांनी न चुकता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयास कळवावी. लम्पी चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने/पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घेण्याचे पशुपालकांना आवाहन करण्यात येत आहे. लम्पी चर्म रोग हा पशुधनातील जरी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो.

राज्यामध्ये दि. २९.९.२०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण २०२३ गावांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३५,७१० बाधित पशुधनापैकी एकूण १६,३०२ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १०६.६२ लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २०२३ गावातील ४८.२८ लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील ३८.९१ लक्ष पशुधन अशा एकूण ८७.१९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात जळगाव आणि अकोला या सर्वांत जास्त बाधित जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले असून इतर जिल्ह्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात एक कोटी – सुमारे 70% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील तीन ते चार दिवसांमध्ये बाधित पशुधनाच्या संख्येत, तसेच बाधित होणाऱ्या गावांच्या संख्येत घट दिसून येत आहे.

सिंह यांनी सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, “लम्पी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी कीटनाशकांची फवारणी करावी, तसेच सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. लंपी चर्मरोगावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी चर्मरोगावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु. 5/- प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहे.

सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी, सेवादात्यांनी तसेच पशुसंवर्धन विभागातील आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा. यासाठी त्यांनी संबंधीत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. शासनाने खाजगी पशुवैद्यकांना लंपी चर्मरोगाचा उपचार करण्यासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24.9.2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार संकेताप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *