Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांचा कोरोना लॉकडाऊन वरील केंद्र व राज्य सरकारच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा लेख जरूर वाचा

अँडर्स टेग्नेल, स्वीडन आणि कोरोना

कोरोनासाथीच्या सुरुवातीच्या काळात प्रथम चीन, आणि त्यानंतर युरोपातील बहुसंख्य देश, अमेरिका, आशियायी देश सर्वांनी कमीअधिक प्रमाणात कडक लॉकडाऊन (संचारास निर्बंध – प्रवाससाधनांना बंदी) असे धोरण आखले, व अंमलात आणले. बघता बघता जगातील एक तृतीयांश लोकसंख्या कुलुपबंद झाली. हे मानवजातीच्या इतिहासात आतापर्यंत कधी घडले नव्हते, हे सारे जबरदस्तीचे कुलुपबंदी धोरण खरेच काम करते किंवा नाही, याबद्दल पूर्वानुभव नव्हता, पण जगातील बहुसंख्य देशांतील राज्यकर्त्यांनी यावर विश्वास ठेवला आणि ते अंमलात आणले.

या लॉकडाऊनमागचा दोन उद्देश होते

१ सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे आपण कदाचित या विषाणूचा प्रसार लांबवू शकतो – जेणेकरून एकाचवेळी अत्यधिक लोकांना याची बाधा होऊन आपल्या आरोग्य सेवांवर अतिरिक्त ताण येऊन त्या कोलमडू नयेत . आणि

२ या “लांबवलेल्या” काळात कदाचित आपल्याला या विषाणूवर परिणामकारक लस किंवा औषध मिळाले तर भविष्यात आपण या विषाणूवर आपण देवी किंवा पोलिओवर मात केली त्याप्रमाणे मात करु शकू.

हे लॉकडाऊनमागचे उद्देश कितपत साध्य झालेत, याबद्दल साशंकताच आहे – कोरोनाने विकसित म्हणवणा-या, आपल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवांचा अभिमान असणा-या पश्चिम युरोप आणि अमेरिकेतली देशांतील आरोग्य सेवा कोरोनामुळे – लॉकडाऊन करूनही – कशी कोलमडून पडली ते    सा-या जगाने पाहिले. आणि औषध वा लस तर अजूनही – लॉकडाऊन नाइलाजाने संपवूनही –  दृष्टिपथात नाही – हेही आपण अनुभवतो आहोत. लॉकडाऊनच्या मानवी जीवनावर झालेल्या आणि पुढे होऊ घातलेल्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक परिणामांवर लिहायचे ठरवले तर पुस्तकेच लिहून होतील.

जवळजवळ सारे जग, जागतिक आरोग्य संघटना लॉकडाऊनची भलावण करीत असतांना, अँडर्स टेग्नेल – स्वीडनच्या कोव्हिड रिस्पॉन्स टीमचा प्रमुख – याने मात्र स्वीडनमध्ये जबरदस्तीचा लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेतला. स्वीडनच्या पंतप्रधानांनी / आरोग्यमंत्र्यांनी अँडर्स टेग्नेलला पूर्णपणे मोकळीक दिली – तो साथरोगशास्त्रातला तज्ञ आहे – तो याबाबतीत सर्व साधकबाधक विचार करून योग्य तो निर्णय घेईल असा विश्वास स्वीडिश राज्यकर्त्यांनी व बहुसंख्य स्वीडिश लोकांनी त्याच्या धोरणांवर दाखवला.

सर्व जगभरात राज्यकर्त्यांनी लोकांना जबरदस्तीने घरात बसायला लावले, शाळा, हॉटेल्स, दुकाने बंद केली, प्रवाससाधनांवर नियंत्रण आणले असतांना स्वीडनमध्ये काय घडत होते ते पाहू या.

१. स्वीडनमध्ये हॉटेल्स, दुकाने, बहुतांश शाळा, कॉलेजेस, जिम्स, स्विमिंग पूल्स, ऑफिसेस चालू होती – त्यावर कायद्याने कोणतेही सक्तीचे बंधन घालण्यात आले नाही.

२. लोकांच्या प्रवासावर वा प्रवाससाधनांवर कोणतेही निर्बंध घातले गेले नाहीत.

३. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घरून काम करावे असे आवाहन शासनाने केले.

४ ५० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास प्रतिबंध केला गेला.

५. मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंट्स रद्द केल्या गेल्या.

६. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याबद्दल कायद्याने कोणतीही सक्ती केली गेली नाही.

स्वीडनच्या या धोरणावर आणि अँडर्स टेग्नेलवर जगभरातून सडकून टीका झाली. विशेषतः एप्रिल २०२० मध्ये स्वीडनमध्ये कोव्हिड आजारामुळे ब-याच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले, यातले अर्ध्याहून अधिक मृत्यू हे स्वीडनमधील वृद्धाश्रमांत (OLD AGE CARE HOME) मध्ये झाले – तेंव्हा तर जागतिक प्रसारमाध्यमांनी “बघा बघा , स्वीडनची , अँडर्स टेग्नेलची क्रूरता बघा, स्वतःच्या देशातल्या वयोवृद्ध नागरिकांचा बळी देऊन त्यांनी लॉकडाऊन न करण्याचा आपला हट्ट पुरा केला” – असा धोशा लावला. अँडर्स टेग्नेलनेही एका रेडिओ मुलाखतीत म्हटले “आम्ही आमच्या वृद्धाश्रमांकडे या साथीत जरा अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले असते तर अधिक चांगले झाले असते…” या त्याच्या स्टेटमेंटवरूनही “कुलुपबंदीविरोधी स्वीडनचे धोरण संपूर्णतः अपयशी –  अँडर्स टेग्नेलला उपरती..” अशा अर्थाच्या बातम्या पेरल्या गेल्या. जगातील, आपापल्या देशातील ल़ॉकडाऊनला योग्य ठरवायचे झाले, तर स्वीडन, अँडर्स टेग्नेल चुकीचे आहेत हे मोठमोठ्याने ओरडून, लोकांवर बिंबवणे आवश्यक – अपरिहार्य होते.

या सर्व काळात अँडर्स टेग्नेल अगदी शांत होता.  बहुतांश स्वीडीश लोकांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला होता, जगातील इतर देशांतील काही जणही त्याचे कौतुक करीत होते, तर बहुतांश माध्यमे त्याला दुराग्रही खलनायकाच्या स्वरूपात रंगवत होती,  तरी सर्व मुलाखतींत तो शांतपणे

“आम्ही या सर्वाचा अभ्यास करीत आहोत, आमच्या मते आम्ही सध्या जे काही करतो आहोत तेच धोरण पुढे चालू ठेवायला हरकत नाही.” असे सांगत होता.

होता होता सप्टेंबर उजाडला. लॉकडाऊन केलेले देश हळू हळू कंटाळून, लोकांच्या दडपणाने उघडू लागले – किती दिवस लोक कुलुपबंदी सहन करणार? टाळेबंदी उघडल्यावर, अपेक्षेप्रमाणे सर्वच देशांत कोरोनाची दुसरी लाट आली. भारतात तर पहिलीच लाट अजून शमली नव्हती. पुन्हा केसेस वाढल्या, पुन्हा मृत्यू वाढू लागले.. स्वीडनमध्ये कोरोनामृत्यूचे शिखर एप्रिलमध्ये झाले तर कोरोनाकेसेसचे शिखर जूनमध्ये झाले. जुलैनंतर स्वीडनमध्ये नवीन कोरोनामृत्यू अगदीच नगण्य प्रमाणात दिसू लागले. जुलैनंतर स्वीडनमध्ये आय सी यू (अतिदक्षता विभागातील) अँडमिशन्स अगदी कमी झाल्या, आणि कोरोनाच्या केसेस सप्टेंबरमध्ये थोड्याबहुत प्रमाणात वाढल्या, पण त्या दरदिवशी तीनशे ते पाचशेच्या (एक लक्ष लोकसंख्येमागे सुमारे २२ ) आसपास होत्या – तर फ्रान्स, स्पेन, यु के – ज्यांनी पूर्वी कडक लॉकजाऊन केला होता –  यांच्या मानाने जेथे की सप्टेंबरमधील कोरोनाच्या दुस-या लाटेत दरदिवशी दहा हजाराच्या आसपास नवीन रुग्ण वाढत होते (एक लक्ष लोकसंख्येमागे फ्रान्स – १६० , स्पेन – २८० तर यु के – ५८ नवीन केसेस).

हे अपेक्षितच होते. कारण लॉकडाऊनने काही विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाही. हा विषाणू बहुतांश बाधितांत अत्यंत सौम्य लक्षणे निर्माण करीत असल्याने तो लॉकडाऊन काळातही कळत नकळत होणा-या प्रसाराद्वारे पृथ्वीतलावर काहीशा भूमीगत अवस्थेत राहणारच आहे. फक्त सोशल डिस्टन्सिंग/ लॉकडाऊन कार्यान्वित असेपर्यंत या विषाणूचा प्रसार व यामुळे होणारे मृत्यु काही प्रमाणात आटोक्यात राहिले. लॉकडाऊन उठवल्याबरोबर लोक परत एकमेकांत मिसळणे चालू झाल्यावर विषाणूचा प्रसार परत जोमाने सुरू झाला.

आता स्पेन, फ्रान्स, यु के , इटली, इस्रायलने परत काही ठिकाणी लॉकडाऊन लागू केला – तर, भारतही संभ्रमात आहेत की लॉकडाऊन – अनलॉक – लॉकडाऊन – अनलॉक नेमके काय करावे…

स्वीडनमध्ये फेब्रुवारी पासून एकसमान धोरण चालू आहे – त्यात फरक पडलेला नाही. त्यामुळे तेथे संभ्रमाची स्थिती नाही.

आता स्वीडनवर , अँडर्स टेग्नेलवर ठपका ठेवला गेला, की लॉकडाऊन न केल्याने स्वीडनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनामृत्यू झाले – याचा परामर्श घेऊ या.

सगळ्यात आधी लक्षात घ्या – स्वीडनमध्ये (मार्च २०२० पासून आजतागायत) कधीही लॉकडाऊन नव्हता. स्वीडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची कधीही सक्ती नव्हती आणि स्वीडनने कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तींना कधीही सक्तीने विलगीकरण वा क्वारंटाईन केले नाही.

एखाद्या प्रदेशातील दहा लक्ष लोकसंख्येपैकी किती जणांचा आजवर कोव्हिडने मृत्यू झाला ही संख्या त्या प्रदेशात कोव्हिडने किती धुमाकूळ घातला वा हाहाःकार माजवला याचे सर्वाधिक विश्वासार्ह द्योतक आहे. या कसोटीवर विचार केला तर स्वीडनला युरोपातील साधारणतः समान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर असलेल्या व सर्वसाधारणपणे समान चांगल्या वैद्यकीय सुविधा असलेल्या देशांमध्ये साधारण मधला क्रमांक देता येईल.

देश कोव्हिड १९ ने झालेले मृत्यू (प्रति १०००००० लोकसंख्या) दि 24 ऑक्टो.-20 पर्यंत कोव्हिड १९ ने झालेले मृत्यू (प्रति १०००००० लोकसंख्या) दि 14 नोव्हे -20 पर्यंत
बेल्जियम 918 1212
स्पेन 743 872
यू के 707 754
इटली 613 730
फ्रान्स 672
स्वीडन 586 609
नेदरलॅंड 406 487
जर्मनी 120 159
डेन्मार्क 120 130
नॉर्वे 51 54

वरील तक्त्यातील बेल्जियम, स्पेन, यू के, इटली, फ्रान्स या देशांनी अत्यंत कडक लॉकडाऊन करून, मास्कची सर्वांवर सक्ती करूनही तिथला कोव्हिड-मृत्यूदर हा स्वीडनपेक्षा जास्त आहे, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. स्वीडनच्या शेजारील स्कॅंडिनेव्हियन देशांपेक्षा (डेन्मार्क, नॉर्वे) स्वीडनचा कोव्हिड-मृत्यूदर जास्त आहे हे खरे, पण आता तेथील (डेन्मार्क, नॉर्वे मधील) टाळेबंदी उठवल्यानंतर तेथे काय परिस्थिती उद्भवते हे पहावे लागेल.

कोव्हिड साथीच्या ऐन भरात स्पेन, यू के, इटली या देशांच्या वैद्यकीय सेवांची जी अक्षरशः वाताहात झाली ती सर्व जगाने पाहिली. रुग्णांना ह़ॉस्पिटलमध्ये बेड मिळाले नाहीत, डॉक्टरांची उपलब्धताही कमी पडली – स्वीडनमध्ये असे काही झाले नाही. ज्या रुग्णाला जे उपचार आवश्यक होते, ते मिळण्यास कोव्हिड साथीच्या ऐन भरात (एप्रिल २०२० मध्ये) ही स्वीडनमध्ये कोणालाही काहीही त्रास झाला नाही. आणि आता तर काही महिन्यांपासून स्वीडनमध्ये कोव्हिडकरिता केल्या जाणा-या आय सी यू अँडमिशन्स अगदी कमी झाल्या आहेत.

यू के मध्ये सुरुवातीला (मार्च २०२० मध्ये) स्वीडीश धोरणाप्रमाणे लॉकडाऊन न करण्याचे धोरण ठरवले होते, पण ३० मार्चला तो सुप्रसिद्ध इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनचा पेपर आला. त्यात लॉकडाऊन न केल्यास विविध युरोपीय देशांमध्ये किती मृत्यू होतील याबद्दल गणितीय सूत्रांनी आकडेमोड करून काही भाकिते करण्यात आली होती. यात लॉकडाऊन न केल्यास  यू के मध्ये सहा महिन्यांत 500000 तर स्वीडनमध्ये सहा महिन्यांत 85000 लोक मरतील असे भाकीत करण्यात आले होते. या प्रकाशनानंतर युरोपात खळबळ उडाली. यू के ने आपले धोरण बदलले व लॉकडाऊन जाहीर केला. ब-याच युरोपीय देशांनी यू के चे अनुकरण केले व लॉकडाऊन जाहीर केला. अँडर्स टेग्नेलने मात्र स्वीडनला लॉकडाऊनपासून दूरच ठेवले. “गणितीय सूत्रांवर आधारित साथरोगशास्त्राबद्दलची भाकिते फारशी विश्वासार्ह नसतात” असे अँडर्स टेग्नेलने स्पष्टपणे सांगितले – आणि आज सहा महिन्यांनंतर स्वीडनमध्ये कोणताही लॉकडाऊन न करता ६००० पेक्षा कमी लोकांचा झालेला मृत्यू हा इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या गणितीय सूत्रांनी केलेल्या ८५००० मृत्यूंच्या भाकि‍ताचा फोलपणा ठसठशीतपणे दाखवतो आहे.

स्वीडनच्या कोव्हिड धोरणाबद्दल बोलतांना अँडर्स टेग्नेल म्हणतो, “सुरुवातीपासूनच आमचे धोरण हे कोव्हिडविरोधात दीर्घकालीन लढ्याच्या अनुषंगाने आखले होते. कोव्हिड आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे – आपल्याला, समाजाला कोव्हिडसोबत बराच काळ जगायचे आहे, या गृहीतकावर आधारित आम्ही धोरण आखले आहे. अल्पकालीन उपाय (जसे कुलुपबंदी) हे थोड्या काळासाठी काम करतील आणि जरी ते दिसायला आकर्षक वाटतील, तुमची तात्कालिक लोकप्रियता वाढवतील, तरी ते ‘टिकाऊ’ उपाय नाहीत. ते अर्थातच लोकांना कष्टदायक आहेत, आणि कोव्हिडविरोधातील दीर्घकालीन लढाईत त्यांचा फारसा उपयोग नाही, असे आम्हाला वाटते”

ब-याच देशांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली आहे – न वापरल्यास शिक्षा केल्या आहेत. स्वीडनमध्ये मास्कचा वापर सक्तीचा नाही. किंबहुना स्वीडनमधील केवळ ६ टक्के जनता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरते. याबद्दल अँडर्स टेग्नेलला छेडले असता तो म्हणतो, “सार्वजनिक ठिकाणी मास्क हासुद्धा एक अल्पकालीन काहीतरी केल्यासारखे दाखवणारा उपाय आहे. तो खरेच काम करतो की नाही याबद्दल आतापर्यंतच्या अभ्यासातून मिळालेला पुरावा हा फार ठाम नाही.”

कोरोनाविषाणूविरोधातील लसींबद्दल विचारले असता टेग्नेल म्हणतो, “उद्या, परवा कधीतरी कोव्हिडविरोधातील लस येईल, ती आपण सर्वांना देऊ आणि आपण कोव्हिडपासून मुक्त होऊ – असे काहीजण म्हणतात, पण मी मात्र याबद्दल साशंक आहे. विषाणूंचा प्रसार रोखणा-या लसींचा आजवरचा अनुभव लक्षात घेता फार कमी प्रभावी लसी आतापर्यंत तयार झाल्या आहेत, त्या तयार व्हायला बराच काळ लागला आहे, आणि देवीच्या रोगाखेरीज इतर विषाणूजन्य रोगांपासून आपण कधीच मुक्त झालेलो नाही.”

अँडर्स टेग्नेलला कोणी माथेफिरू म्हणले, जागतिक पातळीवर त्याची निंदानालस्ती झाली, त्याला, त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या. दुसरीकडे त्याची लोकप्रियता स्वीडनमध्ये आणि जगात इतरत्रही कमालीची वाढली. लोकांनी त्याचा फोटो असलेले टी-शर्ट घालायला सुरू केले, त्याच्या चेह-याचे चित्र अंगावर गोंदवून घ्यायला सुरू केले. युरोपातील इतर देशांनी गुपचुप त्याच्या धोरणाशी मिळतेजुळते धोरण आखायला सुरुवात केली. अँडर्स टेग्नेलमात्र स्थितप्रज्ञासारखा शांतपणे काम करतो आहे. त्याचे आवडते वाक्य आहे ,“कुठलेही धोरण आखतांना आपण त्या धोरणाच्या दीर्घकालीन परिणामांचा साधकबाधक विचार केला पाहिजे. आणि एकदा का आपण दीर्घकालीन धोरण निश्चित केले, की मग अल्पकाळातील धक्कादायक गोष्टींना न घाबरता, भावनेच्या आहारी न जाता, लोक काय म्हणतील याचा विचार न करता,  थंड डोक्याने, आपल्या धोरणावर विश्वास ठेवून ते राबवले पाहिजे.”

डॉ. चंद्रशेखर साठये 
(shekhar1971@gmail.com)

(लेखक रायगड जिल्ह्यातील अलिबागस्थित अस्थीशल्य विशारद असून सध्या ते स्वतः कोविड-१९ वॉर्ड साठी जिल्हा शासकीय रुग्णालयास स्वेच्छेने सेवा देत आहेत)

अशाच उत्तमोत्तम लेखांसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *