स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे झाली कारवाई
मुंबई, दि. २१ : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) वरचं शुक्लकाष्ठ जायचं नाव घेत नाहीये. नुकतेच आर्थिक गैरव्यवहार आणि बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) या कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. डी. विश्वनाथ आणि अनिल कालिया अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने कंपनीविरुद्ध तसेच संबंधित इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीनुसार, बँकेने कंपनीला विविध पतसुविधा मंजूर केल्या होत्या; मात्र कर्जाच्या गैरवापरामुळे सुमारे २,९२९.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, एकूण १७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांना मिळून सुमारे १९,६९४.३३ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान असे आढळून आले की, कंपनीने स्वतःच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनावट कंपन्यांचा वापर करून गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार केले. तसेच, समूहातील इतर संबंधित कंपन्यांच्या नावाने सवलतीच्या अटींवर पतपत्रे उघडण्यात आली, ज्याचा आर्थिक भार अखेरीस बँकांवर पडला. या व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
डी. विश्वनाथ हे कंपनीचे सह-अध्यक्ष म्हणून समूहाच्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन आणि अंमलबजावणी पाहत होते, तर अनिल कालिया यांनी उपाध्यक्ष या नात्याने त्यांना सहाय्य केल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी कर्जवाटप प्रक्रियेत बँकांशी समन्वय साधण्याबरोबरच निधीच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सांभाळली होती.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून प्राप्त तक्रारींच्या आधारे रिलायन्स समूहाशी संबंधित अनेक प्रकरणांची नोंद करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
