Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“हा माणूस कधीही काहीही अभ्यास न करता फक्त नाटक करण्यात हुशार आहे” – मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधान मोदींवर टीका

“हा माणूस कधीही काहीही अभ्यास न करता फक्त नाटक करण्यात हुशार आहे” – मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधान मोदींवर टीका

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या ५ एप्रिल रोजी रात्री बरोबर ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून पणती, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईल टॉर्च लावून आपल्या एकीच दर्शन करून द्या असे आवाहन सर्वांना केले. यावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस सध्या पडत आहे.

गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ बनवत तिखट प्रतिक्रिया दिली. पण आणखी पुढे जात त्यांनी एका फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावले आहे. पहा नेमकं काय म्हणाले आहेत आव्हाड.

“मी वेडा दिसतोय का?

करोना विषाणू विरुद्धची लढाई जगभरात चालू आहे. फक्त वैद्यकीय तज्ज्ञ नाहीत तर, औषध कंपन्या, सरकारं, स्वयंसेवी संघटना, उद्योग ,आस्थापने, सर्व या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जगभर प्रयत्नांची पराकाष्ठा करताहेत. पैसे दिले जात आहेत, निधी जाहीर होत आहेत, जीवनावश्यक औषधे, सामग्री उत्पादन दुप्पट वेगाने सुरू केले जातेय. या रोगाच्या तडाख्यात सापडलेल्या कोट्यवधी गोरगरीब, दरिद्री जनतेसाठी आर्थिक, शारीरिक मदत उभी होतेय, या विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस शोधण्यासाठीचे काम अहोरात्र चालू आहे. थोडक्यात भरीव काम होत आहे. आतापर्यंत जगात क्वचित आढळून आलेला एक मानवतावाद दिसतोय, एका सह
वेदनेने जग एकत्र आलेय आणि मुकाबला करतेय.

आणि…आमचे भारताचे पंतप्रधान काय करत असतील?
जनतेला मेणबत्ती, दिवे लावायचे आवाहन!!! संदेश ऐकला आणि वाटलं की चुकीचे ऐकले, पण नाही..देशवासियांना दिवे लावण्याची भावपूर्ण साद माननीय पंतप्रधानांनी घातलीय..आपला भारत या संकटाचा मुकाबला कसा करणार आहे? सरकार कोणती पावले उचलणार आहे?काय मदत दिली जाणार आहे? संचारबंदीच्या काळात अडकून पडलेल्या लाखो स्थलांतरित मजूर श्रमिक कामगारांसाठी काय उपाययोजना केली जाणार आहे?आर्थिक घडी डळमळीत झालीय, हातावर पोट असणारे आणि त्यासारखे अनेक अक्षरशः रस्त्यावर आलेत त्यांचे काय करणार आहोत? या आणि यासारख्या अनेक ज्वलंत भीषण प्रश्नांना साधा स्पर्श किंवा त्यांचा उल्लेख न करतात पंतप्रधान काय म्हणाले, तर दिवे लावा!!
आता यावेळी रोम जळत असताना तंतुवाद्य वाजवण्यात आत्ममग्न असणाऱ्या निरो राजाची आठवण का येऊ नये?

पंतप्रधानांचे सकाळचे आवाहन हे बेजबाबदार, माणुसकीशून्य आणि आत्ममग्न माणसाचा आरसा म्हणावा असे होते. संकटकाळी पंतप्रधान किंवा देशप्रमुखाने कसे वागू नये याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे पंतप्रधानाचे आजचे निर्दयी भाषण!!
हा माणूस कधीही काहीही अभ्यास न करता फक्त नाटक करण्यात हुशार आहे. जेणेकरून मूळ समस्येवर उत्तर किंवा तोडगा द्यावा लागणार नाही. त्याचे हृदयद्रावक भाषण संपले की तातडीनं मग देशोभरातील विकाऊ, भाडोत्री भक्तगण ते विजेच्या वेगाने फिरवतो आणि सतत तेच ऐकलं की सत्य वाटू लागते. इथं लोकांकडे अन्न घ्यायला दिडकी नाही आणि ते दिवे लावायला तेल कुठून आणतील? याचा साधा विचारही यांना करावासा वाटला नाही?
देशातील ५०% जनतेकडे शिधापत्रिका नाही हे यांना ठाऊक नाही? अनेक कुटुंबं भाड्याच्या घरात राहतात, अनेक भटकी आहेत त्यांना हे शक्य नसते याची कल्पना नसावी? शब्दशः इथं विष खायला दिडकी नाही आणि हे सांगतात दिवे लावा!!!!

माणसाकडे मुळात काही नसले की मग शब्द भावनांचे असे पोकळ बुडबुडे आणले जातात. दिसायला छान पण क्षणिक!! लोकांच्या भावनेला आवाहन करून, डोळ्यात हुकमी पाणी आणून, मूळ प्रश्नावरून त्याना विचलित केलं की मग पुढील मुद्दा असतो तो विविध दिखाऊ कार्यक्रमांचा! त्यात मग थाळ्या बडवा, शंख फुंका, टाळ्या वाजवा असे बालिश उद्योग दिले जातात. भूक, उपासमार, आजार याने खंगलेल्या माणसाला टाळ्या वाजवायला सांगायचे हा कोणता उपाय? हे फक्त निर्दय, भावनाशून्य माणसालाच सुचू शकते आणि त्याचे अनेक भक्त, भाट, खुशमस्करे ती आज्ञा इमानेइतबारे पाळतात, त्या कोलाहलात मूळ मुद्दा विसरून जातात. देशभक्तीच्या या क्षणिक उमळ्यात बुडतात ..सारासार विचारशक्ती गमावलेले असे अंधभक्त हीच या माणसाची ताकद आहे. यथा राजा तथा प्रजा…तार्किक विचार नसणारा लहरी निर्दय राजा आणि त्याचे तितकेच आचरट भाट …अश्या बालिश चाळयामागे आपले अपयश झाकू पाहतात. बौद्धिक दिवळखोरीचे इतके उत्तम उदाहरण दुसरे नसावे!!
पण माझा अश्या आचरट प्रकाराला विरोध होता, आहे आणि राहील. मी यात सामील होणार नाही. जे दोन चमचे तेल कोणा गरीबाच्या शिळ्या भाकरीवर पडून तिला मऊ करेल ते मी अश्या मूर्ख कारणासाठी वापरणार नाही, मेणबत्ती लावून कोणा गरीबाच्या झोपडीत असणारा अंधार दूर कारेन पण इथं ती पेटवणार नाही सर्व माणसांना तुम्ही नेहमी गंडवू शकत नाही हे मोदी यांना जाणवून देण्याची वेळ हीच आहे

डॉ. जितेंद्र आव्हाड

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *