अॅटलस स्किलटेक यूनिवर्सिटी येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन’चे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. २४ : आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग विविध क्षेत्रांमध्ये व्यापक परिणाम घडवणार असून या तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी मूल्यांचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती वाढवत असताना ती अधिक संवेदनशील बनवण्याबाबत गंभीर चिंतन होणे गरजेचे असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा, असे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील Atlas SkillTech University अॅटलस स्किलटेक यूनिवर्सिटी येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘गव्हर्निंग एआय : कायदा, तंत्रज्ञान व समाज’ या विषयावरील चर्चासत्राचाही शुभारंभ करण्यात आला. हे चर्चासत्र O. P. Jindal Global University ओ. पी. जिंदाल ग्लोबल यूनिवर्सिटी आणि ‘सिरील श्रॉफ सेंटर ऑफ एआय, लॉ अँड रेग्युलेशन’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
तंत्रज्ञान उपलब्ध असूनही त्यामागे स्पष्ट उद्दिष्ट नसणे किंवा विज्ञानासोबत मानवी मूल्यांची सांगड न घातल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे सांगताना राज्यपालांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात दया, अनुकंपा आणि सहानुभूती या मूल्यांचा समावेश आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता विकसित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या प्रगतीच्या संदर्भात त्यांनी विविध काळातील घोषणांचा उल्लेख करत ‘जय जवान’, ‘जय किसान’, ‘जय विज्ञान’ आणि ‘जय अनुसंधान’ या संकल्पनांमधून भारताचा प्रवास स्पष्ट केला. ‘विकसित भारत’ ही संज्ञा केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून सर्वांगीण व समावेशक विकासाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पारंपरिक कला आणि हस्तकला जतन करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे अनेक कला प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत, अशा कलांचे संवर्धन करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. एखादी कला जतन करणे म्हणजे ती संग्रहालयात ठेवणे नव्हे, तर तिला नवसंजीवनी देणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान एआय गव्हर्नन्स विषयक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच राज्यपालांनी विद्यापीठाच्या नाविन्यता केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या संशोधन व प्रकल्पांची माहिती घेतली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
