“ज्यांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला त्यांना खुजं दाखवण्याचा, त्यांची प्रतिमा हतबल योद्धा दाखवण्याचा प्रयत्न” – अतुल शिलवंत
मुंबई, दि. ३०: बरोबर ६ दिवसांपूर्वी, २४ एप्रिल रोजी स्वयंघोषित बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री Dhirendra Krishna Shastri याने नागपूर येथे भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत एक वादग्रस्त विधान केले होते. आपल्या भाषणादरम्यान अकलेचे तारे तोडत धीरेंद्र शास्त्री म्हणाला कि, “एक दिवस युद्ध करून-करून छत्रपती शिवाजी महाराज थकले व ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. यावेळी त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि समर्थ रामदास यांना म्हणाले कि, मी खूप लढाया लढलो, खूप युद्ध केलं..आता मला लढायचं नाही..एक मोठी कृपा करा..हा मुकुट तुम्ही सांभाळा..हा राज्यकारभार सांभाळा..तुमच्याच आज्ञेने आम्ही चालू..आता माझ्याच्याने चालणे होत नाही….” या नंतर राज्यभरात समस्त शिवप्रेमी व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. राज्यातील विविध पोलीस स्थानकांत शिवप्रेमींकडून तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अतुल शिलवंत Atul Shilwant यांनीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित मोडणाऱ्या उलवे पोलीस स्थानकात आज एक तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रामकृष्ण राजणे यांनी त्यांच्या तक्रार अर्जाचा स्वीकार केला.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल शिलवंत म्हणाले कि, “गेल्या आठवड्यात नागपूर इथल्या एका कार्यक्रमात आपल्या भाषणा दरम्यान, कथित भोंदुबाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ धीरेंद्र कृष्ण गर्ग उर्फ बागेश्वर बाबा याने हेतुपुरस्सर हिंदवी स्वराज्याचे निर्माते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास मांडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत इत्यादी मंडळी होती, त्यांनी या बाबाला थांबवण्याचा किंवा त्यांची चूक दाखवण्याचा जराही प्रयत्न केला नाही. तुम्ही-आम्ही शाळेत असताना जो इतिहास अभ्यासला त्यात अशा प्रकारचा कोणताच उल्लेख नव्हता व आजही नाही. किंबहुना, माझ्या माहिती प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटना उलगडणाऱ्या, लेखाजोखा मांडणाऱ्या बखरींमध्येही, अगदी विवादास्पद बखरींमध्ये, पत्रांमधेही असा कोणताही उल्लेख आढळलेला नाही. मग हा जावई शोध त्यांनी लावला कुठून?”
पुढे अतुल शिलवंत म्हणाले, “धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने आपल्या भाषणादरम्यान सराईतपणे मांडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास एका व्यापक कटाचा भाग असल्याचं जाणवतंय. एकतर त्याने कोणत्यातरी दूषित हेतूने खोटा इतिहास स्वतःहून मांडला असावा किंवा त्याला तसं करायला कोणीतरी सांगितलेलं असू शकतं. या बाबाने केलेलं वक्तव्य रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कमीपणा दाखवणारं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष ज्यांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य उभारलं, आपल्या हयातीत अलौकिक साहस व शौर्य गाजवत, नियोजनबद्ध कारभार करत आपलं साम्राज्य वाढवलं, मराठा साम्राज्याचा पाया रचला त्यांना खुजं दाखवण्याचा, त्यांची प्रतिमा हतबल योद्धा दाखवण्याचा प्रयत्न धीरेंद्र कृष्ण शास्त्री ने आपल्या भाषणात केला. हे असं वक्तव्य करून समाजाच्या-आमच्यासारख्या शिवप्रेमींच्या भावना दुखवाव्यात व त्यायोगे हिंसक आंदोलन होऊन महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण गढूळ व्हावं असा या कथित भोंदूबाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री व त्याच्यासह इतर कट रचणाऱ्यांचा हेतू असल्याचं मला जाणवतंय” असे म्हणत त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याबाबत शंका उपस्थित केली.
शेवटी ते म्हणाले कि, “अशा प्रकारे कट रचून छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडणाऱ्या धीरेंद्र शास्त्री व चमूवर कठोर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा एक चुकीचा पायंडा पडू शकतो. भविष्यात अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर वीरपुरुष-युगपुरुषांचा खोटा इतिहास कोणत्याही आधाराशिवाय उठसूट कोणीही मांडू शकतो आणि त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून अस्थिरता येऊ शकते. हे सर्व मुद्दे मी माझ्या तक्रार अर्जात नमूद केलेत. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे कि त्यांनी या धीरेंद्र कृष्ण शास्त्री सारख्या बाबावर कठोर कारवाई करावीच शिवाय भविष्यात अशांसोबत कोणत्याही कार्यक्रमात मांडीला मांडी लावून बसू नये.”
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा विरोधात पोलीस गुन्हा दाखल करतील का याबाबत अतुल शिलवंत साशंक आहेत. जर नवी मुंबई पोलिसांनी बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशारा शिलवंत यांनी दिला. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. या प्रकरणात नवी मुंबई पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.
