तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासनाची युद्धपातळीवरील मोहीम
मुंबई, दि. ३० : राज्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद पडले असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी दिली. तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर कार्यरत असून पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि सक्षम करण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दि. २७ एप्रिलच्या रात्रीपासून ‘आपले सरकार’ पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे अनेक शासकीय सेवा विस्कळीत झाल्या आहेत. जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज तसेच अन्य ऑनलाईन सेवांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि चौकशी सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाआयटीचे पदाधिकारी तसेच तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित होते. पोर्टल बंद पडण्यामागील मूळ कारण शोधून ते कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्वतंत्र विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयटी अभियंते, सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.
प्राथमिक तपासणीत काही तांत्रिक प्रणालींमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून त्यावर तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोर्टल अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक सुरक्षा प्रणाली, डेटा संरक्षण यंत्रणा आणि वेगवान सर्व्हर व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाने या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशीही समन्वय साधला आहे. मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्टसारख्या कंपन्यांच्या तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले जात असून संपूर्ण यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आली आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, “नागरिकांना अखंडित आणि सुरक्षित डिजिटल सेवा देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे तात्पुरत्या अडचणींवर मात करून ‘आपले सरकार’ पोर्टल अधिक सक्षम स्वरूपात पुन्हा सुरू केले जाईल.”
दरम्यान, पोर्टल बंद असल्यामुळे शासकीय सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. अनेक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणारे नागरिक अडचणीत आले आहेत. ही गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने सेवा केंद्रांना पर्यायी प्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा आणि आवश्यकतेनुसार सेवा केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील डिजिटल प्रशासन व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानले जाणारे ‘आपले सरकार’ पोर्टल पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी शासनाकडून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर दिला जात आहे.
