नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश
बुलढाणा, दि. २० : नागरिकांच्या विविध तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करून त्यांचे समाधानकारक निराकरण करावे, अशा स्पष्ट सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. चिखली तहसील कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या जनसंवाद उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून कार्यक्रमादरम्यान ११० हून अधिक निवेदने प्रशासनाकडे प्राप्त झाली. महसूलमंत्र्यांनी प्रत्येक निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार स्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवण्यासाठी मंडळ स्तरावर ‘छत्रपती महाराजस्व शिबीर’ आयोजित करण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन काम करणे आवश्यक असून कामात हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासन अधिक कार्यक्षम आणि गतिमान राहावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे आढावा घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात मालकी हक्काचे प्रश्न, रस्ते, वाळू उत्खनन, कृषी विषयक अडचणी, शेतकरी आत्महत्या, घरकुल योजना, पाणीपुरवठा, क्रीडा, आरोग्य आणि बांधकाम यांसारख्या विविध विषयांवरील निवेदने मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आली. अनेक नागरिकांनी वैयक्तिक अडचणी मांडत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
प्राप्त सर्व निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, जनसंवाद उपक्रमातून प्रशासन आणि नागरिकांमधील थेट संवाद अधिक प्रभावी होत असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले.
