Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या उन्हाळ्यात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठीची खास गुपितं

जाणून घ्या उन्हाळ्यात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठीची खास गुपितं

आयुर्वेद कुतूहल
उन्हाळा आणि त्याच्या झळा
(उन्हाळ्यातील आहार विहार)
तसे पहायला गेले तर ग्रीष्म ऋतुस म्हणजे उन्हाळ्यास अजून सुरुवात झाली नसली तरी त्याची झळ मात्र लागायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच आतापासून उन्हाळ्याची ऋतुचर्या पाळणे आवश्यक आहे.

१) उन्हाळ्यात वातावरणात दाह आणि पर्यायी पित्त वृद्धी असल्याने त्याअनुसार आहार विहार आयुर्वेदात सांगितला आहे. ह्या काळात अधिक जलभाग असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे, दुधी, भोपळा, दोडके अशा हलक्या फळभाज्या खाव्यात, आहारामध्ये मधुर रसाचे प्राधान्य असावे व आंबट रस सुद्धा असावा परंतु ज्याने पित्त वाढणार नाही असा आंबट रस, म्हणूनच ह्या काळात कोकम सरबत, डाळिंब, कैरीचे पन्हे ,शहाळ्याचे पाणी अशा पेयांचे विशेष महत्त्व आहे.

२) पालेभाज्या व कडधान्य ह्यामुळे पित्त वाढते आणि म्हणूनच ह्यांचा वापर उन्हाळ्यात कमी असावा, ह्याला अपवाद म्हणजे चवळी पाल्याची भाजी, लाल माठ आणि मूग हे पथ्यकारक आहेत त्यामुळे ह्याचे सेवन करण्यास हरकत नाही, फक्त मुगास मोड न आणताच भाजी करावी.

३) जेवणामध्ये अधिक मसालेदार, तेलकटपदार्थ विशेषतः deep fry केलेले पदार्थ खाऊ नयेत.

४) मांसाहार तसा व्यर्ज आहे परंतु करायचा असल्यास त्यात रस्सा म्हणजे पाण्याचे प्रमाण अधिक असावे, कोळंबी सारखे shell fish आधीच गरम असतात म्हणून ह्या काळात अश्या माशांचे सेवन टाळावे.

५) ह्या काळात अनेक जण थंड असते म्हणून ताक पितात, वस्तुतः ताक थंड नसून गरम आहे आपल्याला ते जिभेवर जरी गार जाणवले तरी आतमध्ये ते उष्ण क्रिया करते, म्हणूनच पाचन क्रियेत बिघाड झाला की अनेक वेळा औषधीय आहार म्हणून ताकाचा उपयोग होतो. अशा वेळेला जर ताक प्यायचे असल्यास ते ताजे म्हणजेच रात्री विरजायला टाकलेले दही सकाळी त्याचे फ्रीज मध्ये न ठेवता अधिक मात्रेत पाणी घालून ताक करावे व मीठाचे प्रमाण कमी असावे साखर व धणे पूड चालेल परंतु ताक हे सकाळीच घ्यावे रात्री नाही.

६) फळांमध्ये ह्या ऋतूतील सर्व फळं जरूर खावीत तसेच केळ आणि खोबरं ह्याच सेवन देखील ह्या ऋतूत सांगितले आहे, त्याच प्रमाणे दूध तांदळाच्या शेवया असे पदार्थ आहारात समावेश करण्यात यावेत.

७) मद्यपानास ह्या ऋतुत मनाई आहे, तरी सतत मद्यपान करणाऱ्यांनी पाण्याचे प्रमाण अधिक ठेवावे.

८) Dusting powder च्या ऐवजी पूर्वी चंदन उगाळून अथवा वाळ्याचा लेप अंगाला, डोक्याला, अधिक घाम येणाऱ्या ठिकाणी लावला जात असे, ह्यांच्यातील तुरट रस घाम शोषून घेतो तसेच शीतलता सर्व शरीरास शांत करते आणि त्याचा सुगंध घामाचा दुर्गंध थांबवतो आणि म्हणूनच ह्यांचा वापर या काळात देखील अवश्य करावा.

९) संपूर्ण शरीराचा आतील दाह शांत करण्यासाठी ह्या ऋतुत पाणी देखील वाळा, धणे घालून गार केले जात असे जेणेकरून पित्त वाढणार नाही. फ्रिज मधील पाणी गार जरी असले तरी ते गरम पडते आणि मडक्यातील पाणी गार असते म्हणूनच ते तहान भागवते.

१०) उन्हाळ्यात काम नसल्यास सहसा दुपारी बाहेर पडू नये आणि बाहेर असताना टाळू टोपी, छत्री, रुमाल ह्यांच्या साहाय्याने झाकावा जेणेकरून Heat stroke उष्माघाताचा तडाखा बसणार नाही.

११) ह्या ऋतुत दिवस मोठा रात्र छोटी असते म्हणून दिवास्वाप म्हणजे दुपारी वामकुक्षी चालते.
१२) वस्त्र सुती, सैल, हलकी वापरावीत.

१३) बाहेर दाह असल्याने शरीर आधीच निरुत्साही आणि निस्तेज असते म्हणूनच आयुर्वेदात ह्या काळात अधिक व्यवाय म्हणजे शाररीक संबंध ठेऊ नये असे सांगितले आहे जेणे करून शरीरास हानी होऊ नये.

वर वर पाहता हे सर्व फार सामान्य वाटते परंतु ह्या गोष्टींचे योग्य पालन केले तर पुढल्या काळात अनेक रोगांपासून मुक्तता मिळते, म्हणूनच प्रत्येक ऋतूतील ऋतुचर्या हि महत्वाची असते आणि त्याचे पालन अवश्य करावे.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
shardulchavan88@gmail.com

जगदंब The Ayurvedic World

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *