Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : ‘कदाचित अजूनही’ या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने  साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळयाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी, लेखक, ‍दिग्दर्शक गुलजार उपस्थित होते. यावेळी श्रीमती पाटील यांना  साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार आणि उपाध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते मराठी भाषेतील उत्कृष्ट लेखनासाठी साहित्य अकादमीचा  वर्ष 2019 च्या पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. यावेळी अकादमीचे  सचिव डॉ. के. श्रीनिवास राव उपस्थित होते.

‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाविषयी…

अनुराधा पाटील यांचा ‘कदाचित अजूनही’ हा पाचवा काव्यसंग्रह आहे. ‘कदाचित अजूनही’ मध्ये आशय विषयाचे वैविध्य ठळक जाणवते. पर्यावरण, माध्यमे, हिंसा, जगण्यात आलेली आक्रमकता आणि अतिवेग यावर कवितांतून त्यांनी भाष्य केलेले आहे. यातील ‘हरेक क्षण अदृश्य सोबत करणाऱ्या मृत्यूबाबत….  . ‘आतल्या काळोखात पाकळी पाकळीनं उमलत गेलेला मृत्यू..’, ‘हजारो पाकळ्यांचं काळं कमळ..’ या कविता आत्मविश्लेषण करायला लावतात. थकल्या भागल्या संध्याकाळी चारदोन कष्टकरी बायांनी ओवरीवर बसत एकमेकींना चार सुखदु:खाचे बोल सांगावेत, तशी त्यांची कविता आहे. ती खुपणारे आचपेच गडदपणे मांडते; पण किंचितही आवाजी, आक्रस्ताळी होत नाही. तरी वाट्याला आलेल्याचा निमूट स्वीकार न करता बदलाचे दानही ती भवतालाकडे मागते अन् म्हणते, ‘बाळाची टाळू भरणारा मायाळू हात त्यांच्याही माथ्यावर असो..’ अशा मार्मिक आशयाच्या यामधील कविता आहेत.

या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून संयत विवेकशीलपणे श्रीमती पाटील चांगुलपणाला आवाहन करतात. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वने, झाडे-झुडपे, नद्या-समुद्र-वारे, चंद्र-सूर्य असा निसर्गाचा उल्लेख आहे. या सर्व कविता ग्रामीण, शेती संस्कृती आणि एतद्देशीय पंरपरेशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्य संग्रहात दिसून येते. गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगोऱ्यांचे तटस्थ दर्शन कवितेतून घडते. मुंबई येथील ‘शब्द प्रकाशन’ने 2005 ‘कदाचित अजूनही’ हा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहत आल्या असून ‘दिगंत’, ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळ’ हे त्यांचे प्रसिद्ध काव्य संग्रह आहेत.

त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *