Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“हो आम्ही अलिबागवरूनंच आलो आहोत आणि..”; सोनी टीव्ही वरील आक्षेपार्ह टिपणीमुळे अलिबागकर भडकले

फक्त माफीनामा व घेता सोनी टीव्ही व गायक आदित्य नारायण वर कायदेशीर कारवाई चे दिले सूतोवाच

अलिबाग/मुंबई, दि.२४: “मैं अलिबाग से आया लगता हुं क्या?” अशा आशयाचा डायलॉग काही वर्षांपूर्वी एका हिंदी चित्रपटात आला होता. मागील काही वर्षांत या डायलॉग चा वापर करून समोरच्या व्यक्तीला हिनवण्याचे अथवा वेड्यात काढण्याचे प्रकार वाढलेले दिसतात. अद्यापही अनेक सेलिब्रिटी टीव्ही, इंटरनेट या माध्यमांवर या ओळीचा संवादांमध्ये वापर करून अलिबागकरांच्या भावनांशी खेळत आहेत.

काल दिनांक २३ मे रोजी सोनी टीव्ही वरील ‘इंडियन आयडल १२’ कार्यक्रमाच्या अलिकडेच प्रसारित झालेल्या भागात गायक उदित नारायण यांचा पुत्र व या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायण याने दोन स्पर्धकांना उद्देशून हाच आक्षेपार्ह डायलॉग मारला होता. मुळात या ठिकाणी सोनी टीव्ही ला हा भाग कापता आला असता परंतू तसे न करता त्यांनी अलिबागकरांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचंच काम केलं आहे.

या संदर्भात काही अलिबागकरांनी महाराष्ट्र वार्ता च्या नजरेस सदर विषय आणून दिला व याबाबत आदित्य नारायण व विशेषतः सोनी टीव्ही ने जाहीर माफी मागण्याची मागणी केली. तर मूळचे अलिबाग चे नसलेले परंतू काही वर्षे कामानिमित्त अलिबाग ला राहिलेले पाटील नावाचे गृहस्थ म्हणाले की अलिबाग सारखं उच्च व सुरक्षित जीवनमान असलेलं शहर आपण पाहिलेलं नाही. या अशा ठिकाणाबद्दल जर अपप्रचार केला जात असेल तर अलिबागकरांनी सोनी टीव्ही व संबंधित कलाकाराला कोर्टात खेचणे योग्य ठरेल. आणखी एक मूळच्या अलिबाग पण सध्या मुंबईत राहणाऱ्या गृहिणी म्हणाल्या की, “हो.. आम्ही अलिबाग वरूनच आलो आहोत आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. ज्या चित्रपटसृष्टीने आमचा अपमान केला आहे तीच चित्रपट सृष्टी शनिवार-रविवार अलिबाग मधल्या आपल्या फार्म हाऊस वर मजा मारायला येत असते. याला कृतघ्नपणा म्हणतात; बाकी काही नाही!”

अलिबाग हे छत्रपती शिवरायांच्या पद:स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे. अलिबाग ला खूप मोठा प्राचीन इतिहास लाभला असून येथून अर्ध्या तासांवर असलेल्या चौल-रेवदंडा या ठिकाणी समृद्ध अशा चोलवंशिय राजांची राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा अलिबाग जवळचे अनेक किल्ले हे महाराजांच्या अधिपत्याखाली होते. दर्यासाम्राट सरखेल कान्होजी आंग्रे यांनी याच समुद्रात आपली मर्दुमकी गाजवली होती व त्यांचा मृत्यूही याच पावन भूमीत झाला होता.

कालांतराने मध्य कोकणातील हा भाग आपल्या विस्तीर्ण समुद्र किनारे, नारळी-पोफळी च्या बागांमुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध पावला. मुंबईपासून २ तासांच्या अंतरावर असलेलं अलिबाग हे दिवसीय पिकनिकसाठी सर्वांच्या पसंतीचं ठिकाण बनलं. शिवाय आता रोरो सेवेमुळे मुंबईतर अगदी हाकेच्या अंतरावर आली आहे.

अलिबागकरांबाबत बोलायचं झालं तर कोकणी माणसाचे सर्व गुण त्यांच्या अंगात भिनले आहेत. ‘टेंशन लेने का नहीं आणि देनेका भी नहीं’ असा काहीसा हॅपी गो-सुशेगात मूड असलेली इथली माणसं स्वभावानेही मायाळू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अद्याप अलिबाग व लगतच्या परिसरात मोठ्या दंगली, जाळपोळ असले हिंसक प्रकार झालेले पाहण्यात व ऐकण्यातही आलेले नाहीत. मग नेमका प्रश्न हा पडतो की अशा या निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेल्या व सुसंस्कृत माणसांनी संपन्न अशा अलिबाग बाबतच असे विशिष्ट ‘डायलॉग’ का मारले जातात. माणूस ज्या शहरात-गावात जन्मतो, जेथे त्याचं संगोपन होतं, जेथे राहतो त्याबद्दल त्याला एक आपुलकी असते. त्या ठिकाणाशी त्याचं भावनिक नातं असतं. नेमकं याच बाबीकडे अलिबागकर साऱ्यांचं लक्ष वेधत आहेत.

सोनी टीव्ही कडून झालेला हा प्रकार खोडसाळपणा याच सदरात मोडतो असं मानण्यास नक्कीच वाव आहे. त्यामुळे आता ही कीड कायमची उखडून काढण्यासाठी भविष्यात अलिबागकर कायदेशीर लढाई लढतात की सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *