ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन करण्यासाठी उत्साही उपस्थिती
नवी मुंबई, दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या संदेशाचा प्रत्यक्ष अविष्कार घडविणारे नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर १५, ऐरोली येथे उभारलेले बाबासाहेबांचे स्मारक हे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून सर्वत्र नावाजले जात आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी याठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सध्या उन्हाचा कडाका जास्त असला तरी सायं. ६ वाजेपर्यंत ९४०० हून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट दिली. संध्याकाळी ४ नंतर नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मुलाबाळांसह याठिकाणी भेट देण्यास जास्त पसंती दर्शविल्याचे चित्र बघायला मिळाले व भेटी देणा-यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसले. नवी मुंबईतून ठिकठिकाणाहून निघणा-या मिरवणूका, रॅली यांनीही स्मारकाला भेट देऊन अभिवादन करून पुढे जाण्यास पसंती दर्शविली.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्मारकास भेट देऊन विनम्र अभिवादन केले. स्मारकाला भेट देणा-या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार व चहापाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याठिकाणी भेट देत सर्व सुविधांची पाहणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी उत्तम व्यवस्थेबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेची प्रशंसा केली. संध्याकाळनंतर वाढलेला नागरिकांचा ओघ रात्री उशीरापर्यंत सुरू राहील असे चित्र होते. २०२१ मध्ये ५ डिसेंबरला स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर या स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वातीन वर्षात ३ लाख ६१ हजार ४४५ इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी तेथील रजिस्टरमध्ये नोंद करून या ठिकाणी भेट दिली आहे. येथील विविध सुविधा कक्षांना भेट देत बाबासाहेब आपल्यासोबत आहेत अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असून अनेक मान्यवर, व्याख्याते व अभ्यासकांनीही जगातील बाबासाहेबांच्या स्मारकापेक्षा हे आगळेवेगळे स्मारक असल्याचे अभिप्राय दिले आहेत.
स्मारकातील समृद्ध ग्रंथालयात ५२८२ इतक्या मोठ्या संख्येने बाबासाहेबांनी लिहिलेली व बाबासाहेबांसह इतर महनीय पुरुषांच्या चरित्रावर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तसेच ऑडिओ व्हिज्युअल ‘इ- लायब्ररी’ सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे हे ग्रंथालय म्हणजे सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच अभ्यासकांसाठीही ज्ञानसमृद्ध असा ठेवा आहे. या ठिकाणचा ‘विशेष संविधान कक्ष’ संविधानाची महती मनामनात रुजवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामध्ये संविधानाच्या मूळ प्रतीची प्रतिकृती नागरिकांना हाताळता येत असून संविधानविषयक ग्रंथसंपदा त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणा-या जिज्ञासूंसाठी अत्यंत उपयोगी आहे.
बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून २ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेली ‘जागर’ ही विशेष व्याख्यानमाला नागरिकांच्या अतिशय उत्तम प्रतिसादामुळे यशस्वी झाली. सुप्रसिध्द व्याख्याते डॉ.हरीश वानखेडे, प्रा.प्रवीण दवणे, अरूण म्हात्रे, प्रा.हर्षद भोसले, प्रा.मृदुल निळे यांच्या व्याख्यानांप्रमाणेच नामांकित अभिनेत्री छाया कदम यांची मुलाखतही रसिकांना भावली. ॲड. निखिल अडसुळे, आनंद बनसोडे, सुरज वाघमारे, अश्विन नंदापूरकर या विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या युवा व्याख्यात्यांच्या ‘भिमा तुझ्या जन्मामुळे..’ सुसंवाद कार्यक्रमासही रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांची वाढती गर्दी पाहून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून व्याख्याने थेट प्रक्षेपित करावी लागली हा सध्याच्या काळातील व्याख्यानांना अशाप्रकारे गर्दीचा दुर्मीळ अनुभव या व्याख्यानमालेव्दारे घेता आला.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ग्रंथालयांप्रमाणेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मीळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष छायाचित्र दालन हे स्मारकाचे खास आकर्षण असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे अभिप्राय दिले जातात. आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो उपस्थितांना भारावून टाकतो. याशिवाय एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यान केंद्र एक वेगळी अनुभूती देते. अशा विविध वैशिष्ट्यांमुळे हे ज्ञानस्मारक सर्वांचेच आकर्षण केंद्र झाले असून या माध्यमातून बाबासाहेबांचे शिक्षण व ज्ञानातून प्रगतीचे विचार जनमानसात प्रसारित होत आहेत.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही जयंतीदिनी ज्ञानस्मारकाला भेट देत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले तसेच जयंतीनिमित्त स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे व इतर अधिकारी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या स्मारकाला लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे देखील जयंतीदिनाचे खास असे आकर्षण आहे.
