शालेय गटातील ६, खुल्या गटातील १९ किल्ल्यांची निवड; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह स्मृतिचिन्ह
नवी मुंबई, दि. १८ : दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी आणि युवकांनी उभारलेल्या किल्ल्यांमधून शिवकालीन स्थापत्यकला, इतिहासाची जाण आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले. नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेत यंदा १४९ समूह सहभागी झाले असून, प्राथमिक परीक्षणानंतर त्यापैकी २५ किल्ल्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २०२६-२७ या वर्षासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय गटातून २६, तर खुल्या गटातून १२३ समूहांनी नोंदणी करून सहभाग घेतला. दिवाळीत किल्ले उभारण्याच्या परंपरेला प्रोत्साहन देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
प्रत्यक्ष पाहणीनंतर २५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड
स्पर्धेत नोंदणी केलेल्या सर्व १४९ ठिकाणी परीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन किल्ल्यांची पाहणी केली. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे इतिहासप्रेमी फाईन आर्ट कलावंत शिवम घोडजकर आणि प्रशांत धाडवे यांनी प्राथमिक परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.
किल्ल्यांची रचना, बांधकामातील बारकावे आणि कलात्मकता यांचे परीक्षण करण्यात आले. यासोबतच सहभागी मुलांनी आपल्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती आणि त्यामागील संकल्पना सादरीकरणातून स्पष्ट केली. महानगरपालिकेने या किल्ल्यांचे छायाचित्रण आणि चित्रणही केले आहे.
प्राथमिक फेरीतून शालेय गटातील ६ आणि खुल्या गटातील १९ अशा एकूण २५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अंतिम परीक्षणानंतर प्रत्येक गटातील उत्कृष्ट तीन किल्ल्यांना तसेच उत्तेजनार्थ निवड होणाऱ्या तीन किल्ल्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
खुल्या गटात ३० हजारांचे पहिले पारितोषिक
खुल्या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला १० हजार रुपये असे रोख पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे.
शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये दिले जातील. दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके असून, प्रत्येक पारितोषिकाचे स्वरूप ५ हजार रुपये असे आहे. विजेत्यांना रोख रकमेबरोबर स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात येणार आहे.
महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सदस्यांनीही आयोजनात सहभाग घेतला.
महापौर सुजाता पाटील यांनी या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाच्या जतनाला, दुर्गसंवर्धनाबाबत जागरूकतेला आणि मुलांच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. अंतिम फेरीतील परीक्षणानंतर निवड होणाऱ्या किल्ल्यांना पारितोषिके दिली जाणार असून, स्पर्धेच्या निकालाकडे सहभागी समूहांचे लक्ष लागले आहे.

