टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवा शाहजहानपूरपर्यंत विस्तारित
नांदेड, दि. ६ : प्रवाशांची सुविधा, धार्मिक पर्यटनाला चालना आणि विविध राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याचबरोबर टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तार करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत या तिन्ही रेल्वे स्थानकांवर या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
टनकपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पिलीभीत येथे केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. नांदेड रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमास खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे, खासदार डॉ. अजित माधवराव गोपछडे, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, खासदार बळवंत बसवंत वानखेडे, विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ अनंतराव राजूरकर, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले तसेच अन्य वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “टनकपूर–नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षांची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करेल तसेच नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा ठरेल. नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि बसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होईल.”
भारतीय रेल्वेच्या विकासाचा आढावा घेताना त्यांनी पुढे सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारतीय रेल्वेने अभूतपूर्व प्रगती केली आहे. या कालावधीत सुमारे सदतीस हजार किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून रेल्वे जाळ्याचे नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच समर्पित मालवाहतूक मार्ग वेगाने प्रगतीपथावर आहेत. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारा व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये सातत्याने नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहेत. यावर्षी जून महिन्यापर्यंत उन्हाळी हंगामात पंधरा हजारांहून अधिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान सुमारे बारा हजार विशेष गाड्या चालविण्यात आल्या.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नवीन रेल्वे सेवांच्या प्रारंभाबद्दल जनतेचे अभिनंदन करत सांगितले, “नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील विशेषतः बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला आणि नांदेड जिल्ह्यांतील प्रवाशांना मुंबईसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क उपलब्ध होईल. तसेच टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे उत्तराखंड व उत्तर प्रदेशातील भाविकांना नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वाराला जाणे अधिक सुलभ होईल.”

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपल्या संदेशात सांगितले, “टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला चालना मिळून उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. ही नवीन रेल्वे सेवा महत्त्वाच्या स्थळांमधील संपर्क अधिक सक्षम करेल.”
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानताना सांगितले, “जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून या नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. टनकपूर–नांदेड आणि नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील तसेच या भागातील जनतेला अधिक चांगली संपर्क सुविधा उपलब्ध होईल.”
नांदेड रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण म्हणाले, “या दोन नवीन रेल्वे सेवांमुळे नांदेड आणि मराठवाड्याचा देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. गेल्या काही वर्षांत लोकांच्या सहकार्यामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे नांदेड परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झाला आहे.”
महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी सांगितले, “नांदेड–मुंबई एक्सप्रेस विद्यार्थी, भाविक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील प्रवाशांसाठी विशेषतः लाभदायक ठरेल. या नवीन रेल्वे सेवांमुळे परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल.”
खासदार डॉ. अजित माधवराव गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानताना सांगितले, “नांदेड–मुंबई व टनकपूर–नांदेड या नवीन एक्सप्रेस गाड्यांमुळे नांदेडचा महाराष्ट्रातील तसेच उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांशी रेल्वे संपर्क अधिक सुदृढ होईल.”
खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले, “नांदेड–मुंबई आणि नांदेड–टनकपूर एक्सप्रेसमुळे नांदेडचा संपर्क आणि पर्यटनाला अधिक चालना मिळेल. नांदेड हे हैदराबाद, मुंबई आणि नागपूर यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असून प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यात आणखी रेल्वे सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या नवीन रेल्वे सेवांमुळे मराठवाडा, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यांदरम्यानचा रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच धार्मिक पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अधिक सोयीची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
