१२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट; कामांना गती देण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, दि. २ : छत्रपती संभाजीनगर शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याच्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित विभाग, कंत्राटदार संस्था आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
शहरातील वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती गरज आणि आगामी पावसाळा लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथे उभारण्यात आलेल्या सुमारे ३९२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून भविष्यात शहराला अधिक सक्षम आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
पाहणीदरम्यान विभागीय आयुक्तांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेतील विविध घटकांची माहिती घेतली. पाणी प्रक्रिया केंद्र, वातन व्यवस्था, क्लोरीनीकरण यंत्रणा तसेच गाळणी प्रकल्पाच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रामध्ये पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
या पाहणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अपर आयुक्त (विकास व नियोजन) सुषमा देसाई, सहआयुक्त देविदास टेकाळे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मागील काही महिन्यांपासून कामांचा सातत्याने आढावा घेत विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रगतीची पडताळणी केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांना अखंड, शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे उर्वरित सर्व कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका आणि संबंधित कंत्राटदार संस्थांनी परस्पर समन्वय साधून निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत.
तसेच, कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दररोज कामांची पाहणी करून प्रगती अहवाल सादर करावेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण झाल्यास शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचा दाब वाढण्यास, वितरण व्यवस्थेत सुधारणा होण्यास आणि दीर्घकालीन पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय शोधण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असून, संबंधित सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
