रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार होणार; प्रलंबित कामांना गती देण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या वारसा स्थळांपैकी एक असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धन, जतन आणि पर्यटन विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र विविध विभाग आणि यंत्रणांमधील समन्वय वाढवून विकासकामांना गती देणे आवश्यक असल्याचे मत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांनी संबंधित विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रायगड किल्ल्यावर उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, दिशादर्शक फलक, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, रायगडसारख्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या वारसा स्थळासाठी सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे तसेच पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. वारसा संवर्धनाच्या निकषांचे पालन करताना मूलभूत सुविधा आणि विकासकामे रखडू नयेत, यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
रायगड किल्ला जागतिक वारसा दर्जासाठी महत्त्वाचा दावेदार मानला जात असल्याने येथील सर्व विकासकामे वारसा संवर्धनाच्या निकषांनुसारच करण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात अधिक समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीदरम्यान रायगडावरील प्रलंबित कामांची विभागनिहाय माहिती, अंमलबजावणीतील अडचणी, संबंधित विभागांच्या जबाबदाऱ्या आणि पुढील कृती आराखडा यांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित विभाग, तज्ज्ञ आणि हितधारकांशी चर्चा करून हा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करून रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासंदर्भातील पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहितीही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
रायगड किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त भेट देत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसुविधा वाढविणे, स्वच्छता व्यवस्था सक्षम करणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना बळकट करणे आणि वारसा संवर्धनाच्या दृष्टीने दीर्घकालीन नियोजन करणे यावर शासन विशेष भर देत असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
