एप्रिल-मे कालावधीत भारताच्या निर्यातीत दमदार वाढ; एकूण निर्यात १६२.६९ अब्ज डॉलर्सवर, १४.६६ टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली, दि. १६ : भारताच्या परकीय व्यापार क्षेत्रासाठी चालू आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक ठरली असून एप्रिल-मे २०२६-२७ या कालावधीत देशाच्या एकूण निर्यातीमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदविण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील निर्यात वाढीच्या बळावर भारताची एकूण निर्यात १६२.६९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत ही निर्यात १४१.८९ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. त्यामुळे यावर्षी एकूण निर्यातीत सुमारे १४.६६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-मे २०२६-२७ या कालावधीत वस्तू निर्यातीचे एकत्रित मूल्य ८८.९१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके राहिले. मागील वर्षी याच कालावधीत ते ७६.५९ अब्ज अमेरिकी डॉलर्स होते. त्यामुळे वस्तू निर्यातीत १६.०९ टक्के सकारात्मक वाढ झाली आहे.
याच कालावधीत सेवा क्षेत्रानेही निर्यात वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. सेवा निर्यात ७३.७९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली असून मागील वर्षाच्या ६५.३० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे भारताची जागतिक सेवा क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणखी मजबूत झाल्याचे दिसून येते.
मे महिन्यात निर्यातीत १५.८३ टक्क्यांची वाढ
मे २०२६ या महिन्यात भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात ८१.९६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली. मे २०२५ मधील ७०.७६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत ही वाढ १५.८३ टक्के इतकी आहे. त्याचवेळी एकूण आयात ९२.४७ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली असून ती मागील वर्षीच्या ७७.५५ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत १९.२३ टक्क्यांनी वाढली आहे.
मे २०२६ मध्ये वस्तू निर्यात ४५.२० अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली. मागील वर्षी मे महिन्यात ती ३८.३० अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. त्याचवेळी वस्तू आयात ७३.४१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली असून मागील वर्षी ती ६०.८६ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.
पेट्रोलियम, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांची निर्यात वाढीला मोठी चालना
मे २०२६ मधील निर्यात वाढीमध्ये अनेक प्रमुख उद्योग क्षेत्रांचा मोठा वाटा राहिला. विशेषतः पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय व गैरसेंद्रिय रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच रत्ने आणि दागिने या क्षेत्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात मे २०२५ मधील ५.४४ अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून वाढून मे २०२६ मध्ये ८.४२ अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली. या क्षेत्रात तब्बल ५४.८९ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात ९.८९ अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून वाढून १२.३१ अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली असून या क्षेत्रात २४.४८ टक्के वाढ झाली आहे.
सेंद्रिय आणि गैरसेंद्रिय रसायनांची निर्यात २.४१ अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून २.७२ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचली असून त्यात १२.७१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात ४.५७ अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून ५.१० अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली असून या क्षेत्राने ११.६२ टक्के वाढ नोंदविली आहे.
रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्येही वाढ दिसून आली असून ती २.३८ अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून २.५३ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. या क्षेत्रात ६.६६ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
बिगर-पेट्रोलियम निर्यातीतही वाढ
एप्रिल-मे २०२६-२७ या कालावधीत भारताची बिगर-पेट्रोलियम निर्यात ७०.७४ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या ६४.०३ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत ही वाढ १०.४९ टक्के इतकी आहे.
तसेच पेट्रोलियम आणि रत्ने-दागिने वगळून बिगर-पेट्रोलियम निर्यात ६५.८९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली. मागील वर्षी ती ५९.१५ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. यावरून देशाच्या उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रातील निर्यात क्षमतेत सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.
आयातीत वाढ, व्यापार तूटही वाढली
एप्रिल-मे २०२६-२७ या कालावधीत वस्तू आयात १४५.३५ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली. मागील वर्षीच्या १२६.२४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.
त्यामुळे वस्तू व्यापारातील तूट ५६.४४ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली. एप्रिल-मे २०२५-२६ मध्ये ही तूट ४९.६५ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.
एकूण वस्तू आणि सेवा व्यापाराचा विचार केल्यास एप्रिल-मे २०२६-२७ मध्ये व्यापार तूट २०.१३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली असून मागील वर्षी ती १७.९६ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.
सेवा क्षेत्राचीही मजबूत कामगिरी
मे २०२६ मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य ३६.७६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके राहिले. मे २०२५ मध्ये हे मूल्य ३२.४६ अब्ज अमेरिकी डॉलर्स होते. सेवा आयात १९.०६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली असून मागील वर्षी ती १६.७० अब्ज अमेरिकी डॉलर्स होती.
विशेषज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणातही भारताची निर्यात वाढ कायम राहणे हे देशाच्या उत्पादनक्षमता, सेवा क्षेत्रातील सामर्थ्य आणि विविधीकरण झालेल्या निर्यात संरचनेचे द्योतक आहे. आगामी महिन्यांत जागतिक मागणी, उत्पादन वाढ आणि व्यापार करारांच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

