कृषी, अन्नप्रक्रिया, उत्पादन आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांत सहकार्याच्या संधी; २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापाराचे २५ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक संबंधांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यापारासोबतच गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त व्यावसायिक उपक्रमांवर भर देण्याची भूमिका राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी मांडली. दोन्ही देशांतील उद्योगांनी परस्परांच्या क्षमतांचा लाभ घेत दीर्घकालीन भागीदारी उभारावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई येथे इंडो-व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (आयव्हीसीसीआय) ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच व्हिएतनामच्या उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासोबत झालेल्या बैठकीत रावल बोलत होते. राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय संपर्क आणि कृषी विपणन या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
या बैठकीला व्हिएतनामचे मुंबईतील वाणिज्यदूत जनरल ले क्वांग बिएन, आयव्हीसीसीआयचे अध्यक्ष अजयकांत रुईया, उपाध्यक्ष कमल के. सेठ, कार्यकारी सचिव संजय मेहता आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे महासंचालक अजित मंगरुळकर यांच्यासह विविध उद्योगांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
द्विपक्षीय व्यापार १६ अब्ज डॉलरच्या पुढे
भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील व्यापाराने १६ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला आहे. २०३० पर्यंत हा व्यापार २५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. १९९० मध्ये आयव्हीसीसीआयची स्थापना झाली, तेव्हा दोन्ही देशांतील व्यापार काहीशे दशलक्ष डॉलरपुरता मर्यादित होता. त्यानंतरच्या काळात व्यापारवाढीसोबतच आर्थिक सहकार्याच्या संधीही विस्तारल्या आहेत.
भारत–व्हिएतनाम संबंधांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरल्याचे रावल यांनी नमूद केले. मे २०२६ मध्ये व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील संबंधांना ‘वर्धित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देण्यात आला होता.
मुंबई–हो ची मिन्ह सिटी सहकार्यावर भर
मुंबई आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी या दोन्ही शहरांमध्ये आर्थिक विकास आणि शहरी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची संधी असल्याचे रावल यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन्ह सिटी पीपल्स कमिटी यांच्यात झालेल्या सहकार्याच्या चौकटीचे त्यांनी स्वागत केले.
“मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी ही दोन्ही गतिमान आर्थिक केंद्रे आहेत. या दोन्ही शहरांमधील सेतू केवळ अधिकृत शिष्टमंडळांच्या देवाणघेवाणीपुरता मर्यादित न राहता उद्योजक, तंत्रज्ञान, गुंतवणूक, विद्यार्थी आणि कल्पनांची देवाणघेवाण करणारा सेतू झाला पाहिजे,” असे मंत्री रावल यांनी सांगितले.
व्हिएतनामकडे उत्पादन, निर्यात आणि जागतिक पुरवठा साखळीतील अनुभव आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील त्यांची प्रगती आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची क्षमता महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकते. दुसरीकडे, महाराष्ट्रातील वित्तीय सेवा, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, बंदरे, वाहतूक व्यवस्था आणि मोठी ग्राहक बाजारपेठ व्हिएतनामी कंपन्यांसाठी संधी निर्माण करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी आणि अन्नप्रक्रियेत गुंतवणुकीची संधी
कृषी विपणन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावरही रावल यांनी भर दिला. व्हिएतनाममधील विनामिल्क, मासान, विसान, विनाआय अँड टी आणि डोव्हेको या कंपन्यांनी कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया, ब्रँडिंग आणि निर्यातीच्या क्षेत्रात क्षमता विकसित केली आहे.
या कंपन्यांनी भारतात केवळ उत्पादने विकण्याऐवजी महाराष्ट्रात प्रक्रिया, ब्रँडिंग आणि वितरणासाठी सुविधा उभारण्याचा विचार करावा, असे रावल यांनी सुचवले. “व्हिएतनाममधील एखाद्या अन्नप्रक्रिया कंपनीने केवळ भारतात निर्यात का करावी? तिने महाराष्ट्रातच प्रक्रिया, ब्रँडिंग आणि वितरण केंद्र का उभारू नये?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अशा गुंतवणुकीसाठी आयव्हीसीसीआयने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील कंपन्यांनीही व्हिएतनामकडे आसियान देशांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून पाहावे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महायको या कृषी कंपनीची व्हिएतनाममध्ये व्यावसायिक उपस्थिती असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
विंग्रोपच्या गुंतवणूक योजनांचा उल्लेख
व्हिएतनाममधील विंग्रोप समूहाने महाराष्ट्र आणि एमएमआरडीएसोबत केलेल्या सहकार्याच्या चौकटीचाही रावल यांनी संदर्भ दिला. या माध्यमातून सुमारे ६.५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेतला जात आहे. त्यात सुमारे १,००० हेक्टर क्षेत्रातील एकात्मिक शहरी विकास, सुमारे ६०,००० इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
विंग्रोपच्या व्यावसायिक समूहात विनफास्ट, विनएनर्जो, विनमेक आणि विनपर्ल या कंपन्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे विनफास्टची विक्री आणि सेवा व्यवस्था विकसित होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

थेट विमानसेवेमुळे व्यापाराला चालना
मुंबई आणि व्हिएतनामदरम्यान सुरू असलेली व्हिएतजेटची थेट विमानसेवा व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाची असल्याचे रावल यांनी नमूद केले. व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क आणि प्रवासाची सुविधा आवश्यक असल्याचे सांगताना ते म्हणाले, “व्यवसायासाठी कनेक्टिव्हिटी ही लक्झरी नसून पायाभूत सुविधा आहे. कधी कधी एक थेट विमानसेवा दहा परिषदांपेक्षा अधिक व्यवसाय निर्माण करू शकते.”
व्हिएतनाममधील भारतीय समुदायाचाही दोन्ही देशांतील संबंधांमध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तेथे जवळपास ८,००० भारतीय नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी सुमारे ५,५०० जण हो ची मिन्ह सिटी आणि आसपासच्या परिसरात राहतात. ओएनजीसी विदेश, बँक ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांसारख्या भारतीय कंपन्यांचीही व्हिएतनाममध्ये उपस्थिती आहे.
“प्रवासी भारतीय संपर्काची जबाबदारी असलेला मंत्री म्हणून मी प्रवासी भारतीय समुदायाकडे केवळ सांस्कृतिक दुवा म्हणून पाहत नाही. भारत, महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील तो व्यवसाय, ज्ञान आणि लोकांमधील संबंधांचा महत्वपूर्ण सेतू आहे,” असे मंत्री रावल यांनी सांगितले.
व्यापारापलीकडे दीर्घकालीन भागीदारीचे उद्दिष्ट
महाराष्ट्र आणि व्हिएतनाममधील सहकार्य वाढवण्यासाठी तीन प्रमुख बाबींकडे लक्ष देण्याची गरज रावल यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्राने व्हिएतनामकडे आसियान बाजारपेठेत प्रवेशाचे माध्यम म्हणून पाहावे, व्हिएतनामी उद्योगांनी महाराष्ट्राला भारतीय बाजारपेठेतील प्रवेशद्वार मानावे आणि दोन्ही देशांनी व्यापारातून गुंतवणूक व तंत्रज्ञान सहकार्याकडे वाटचाल करावी, अशी त्यांची भूमिका होती.
आयव्हीसीसीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन केवळ व्यावसायिक संपर्कांच्या संख्येवर न करता, त्या संपर्कांतून प्रत्यक्ष करार, गुंतवणूक, संयुक्त उपक्रम आणि रोजगार किती निर्माण झाले, यावर करावे, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासन, व्हिएतनामचे मुंबईतील वाणिज्यदूतावास, आयव्हीसीसीआय आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वयातून सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे रावल यांनी सांगितले. “व्हिएतनामने महाराष्ट्राकडे पश्चिमेकडे पाहावे; महाराष्ट्राने व्हिएतनामकडे पूर्वेकडे पाहावे आणि आयव्हीसीसीआयने हा सेतू सतत व्यस्त ठेवावा,” असे आवाहन त्यांनी केले.
दोन्ही देशांमधील वाढत्या आर्थिक संबंधांचा पुढील टप्पा व्यापारापुरता मर्यादित न राहता गुंतवणूक, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा ठरावा, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
