फसवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
मुंबई, दि. १२ : राज्यात ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया, संकेतस्थळे, संदेश सेवा आणि इतर माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बनावट जाहिरातींमुळे शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, ‘कृषी मित्र’ किंवा इतर कोणत्याही शासकीय भरती प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर, अधिकृत प्रसिद्धीपत्रकांद्वारे अथवा संबंधित विभागीय कार्यालयांच्या माध्यमातूनच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित जाहिराती, संशयास्पद अर्ज प्रक्रिया, वैयक्तिक खात्यावर शुल्क जमा करण्याच्या सूचना किंवा अज्ञात संकेतस्थळांच्या लिंक यांवर विश्वास ठेवू नये.
अलीकडच्या काळात विविध शासकीय योजनांच्या नावाने बनावट संकेतस्थळे, खोट्या भरती जाहिराती आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही भरती प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींची खातरजमा अधिकृत माध्यमांतून करणे आवश्यक असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, युवक आणि नोकरीच्या संधी शोधणाऱ्या नागरिकांची फसवणूक करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. खोट्या जाहिराती तयार करून किंवा प्रसारित करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संबंधितांवर कृषी विभागाच्या वतीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
ते पुढे म्हणाले की, भरती प्रक्रियेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणीशिवाय स्वीकारू नये आणि अधिकृत स्रोतांवरूनच माहिती मिळवावी.
कृषी विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘कृषी मित्र’ भरती किंवा इतर कोणत्याही शासकीय भरतीसंदर्भात संशयास्पद जाहिरात, संदेश, दूरध्वनी कॉल किंवा सामाजिक माध्यमांवरील पोस्ट आढळल्यास तात्काळ जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. वेळेत माहिती दिल्यास अशा फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालणे अधिक सुलभ होईल.
राज्य शासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, शासकीय भरती प्रक्रियेतील सर्व माहिती पारदर्शक पद्धतीने अधिकृत माध्यमांतूनच प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बनावट जाहिराती, खोटे आश्वासन किंवा आर्थिक व्यवहारांच्या मागण्यांपासून नागरिकांनी सावध राहून स्वतःची आणि इतरांचीही फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृषी विभागाच्या मते, नागरिकांची जागरूकता आणि अधिकृत माहितीवर आधारित निर्णय हेच अशा ऑनलाइन व आर्थिक फसवणुकीविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र ठरणार आहे.
