सन २०२६ ते २०२९ या कालावधीत राज्यभर अभियान; बचत गट नोंदणी, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यावर भर
मुंबई, दि. २७ : राज्यातील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि अधिकाधिक महिलांना स्वयं सहाय्यता बचत गटांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने व्यापक राज्यव्यापी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘उमेद’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे सन २०२६ ते २०२९ या कालावधीत महिला बचत गट नोंदणीसह ‘१ कोटी लखपती दीदी’ घडविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून अद्याप कोणत्याही स्वयं सहाय्यता (बचत) गटाशी जोडल्या न गेलेल्या ग्रामीण महिलांना बचत गटांशी जोडण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ, कौशल्य विकास, वित्तीय सेवा आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
वंचित महिलांना बचत गटांशी जोडण्यावर विशेष भर
या विशेष मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या महिला अद्याप बचत गटांशी जोडल्या गेलेल्या नाहीत, त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. विशेषतः हंगामी स्थलांतरित महिला, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील महिलांना ग्रामसखी आणि समुदायस्तरीय संस्थांच्या माध्यमातून प्राधान्याने बचत गटांशी जोडण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ‘१ कोटी लखपती दीदी’ घडविण्याचा संकल्प
देशभरात ६ कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याला गती देत महाराष्ट्रातील १ कोटी ग्रामीण महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
याबाबत माहिती देताना ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमेद’ अभियान हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
जुलै ते ऑगस्ट २०२६ दरम्यान जनजागृती मोहीम
ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, “जुलै ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम आणि क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. या माध्यमातून स्थानिक समुदाय संस्था आणि महिलांना अभियानाच्या विविध टप्प्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.” या कार्यशाळांमधून महिलांना बचत गटांचे महत्त्व, आर्थिक व्यवस्थापन, स्वयंरोजगार आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.
शासकीय योजनांचा कृतिसंगम साधण्यावर भर
या अभियानाद्वारे महिलांना केवळ बचत गटात सहभागी करून घेण्यापुरते मर्यादित न राहता विविध शासकीय योजनांचा कृतिसंगम साधण्यात येणार आहे.
याअंतर्गत महिलांना—
- कौशल्य विकासाचे प्रशिक्षण,
- वित्तीय सेवांचा लाभ,
- स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन,
- महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ,
- उत्पन्नवाढीसाठी विविध योजनांचे एकत्रित लाभ
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई यांच्या स्तरावरून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
याबाबत सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विश्वास व्यक्त करत सांगितले की, “या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात आत्मसन्मान, स्वावलंबन आणि आर्थिक स्थैर्याचे नवे पर्व सुरू होईल.”
महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी ग्रामीण भागातील सर्व पात्र महिलांना या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील बचत गटात अद्याप सहभागी न झालेल्या सर्व पात्र महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने बचत गटांमध्ये सहभागी व्हावे.”
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना संघटित आर्थिक बळ मिळण्याबरोबरच त्यांचे उत्पन्न वाढविणे, स्वावलंबन निर्माण करणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास ग्रामविकास विभागाने व्यक्त केला आहे.
