विलंब झाल्यास कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
नंदुरबार, दि. ५ : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतिगृहाचे बांधकाम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि वेगाने काम करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. मार्च २०२७ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालय तसेच जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, नंदुरबार हा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील मोठा वर्ग शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांना गुणवत्तापूर्ण, अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. रुग्णालयातील सुविधा वाढविणे, आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देणे तसेच विविध पायाभूत अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जिल्हा नियोजन समिती तसेच संबंधित विभागांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाच्या बांधकामाचा आढावा घेताना त्यांनी गेल्या काही महिन्यांतील कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली. उपलब्ध माहितीनुसार प्रकल्पाचे सुमारे ४३ टक्के काम पूर्ण झाले असून निधीची उपलब्धता असतानाही कामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्यामुळे कामकाजात अधिक समन्वय, नियोजन आणि जबाबदारीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्यावा, नियमित अहवाल शासनाकडे सादर करावा आणि संबंधित यंत्रणांनी ठोस कृती आराखड्यानुसार काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. आगामी पावसाळ्यामुळे बाह्य बांधकामांवर मर्यादा येण्याची शक्यता लक्षात घेऊन अंतर्गत कामांना प्राधान्य देण्यास तसेच आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही कंत्राटदारांना देण्यात आल्या.
प्रकल्पासाठी आवश्यक मूलभूत सुविधांच्या उभारणीवरही भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वीज पुरवठ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामातील अडचणीही जिल्हा प्रशासनाने दूर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असून दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नंदुरबारसह परिसरातील हजारो रुग्णांना आधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण आणि विशेष आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम यंत्रणा आणि कंत्राटदार यांनी युद्धपातळीवर काम करावे, असे आवाहन करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासी नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार केला.
