शिरपूर तालुक्यातील दुर्गम जंगलात पाच ठिकाणी लागवड; रोटाव्हेटरच्या साहाय्याने पीक नष्ट
धुळे, दि. १६ : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वन्यजीव अभयारण्याच्या दुर्गम भागात सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदा लागवडीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालय आणि केंद्रीय अंमली पदार्थ ब्युरोने संयुक्त कारवाई केली. जामनियापाणी गावाजवळील अभयारण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली लागवड शोधून काढत तब्बल २.८७ हेक्टर, म्हणजेच ७.०८ एकर क्षेत्रावरील गांजाचे पीक नष्ट करण्यात आले.
महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार डीआरआय आणि केंद्रीय अंमली पदार्थ ब्युरोच्या पथकाने १४ ऑक्टोबर रोजी संबंधित अभयारण्य परिसरात जाऊन पाहणी केली. या तपासणीत जंगलाच्या आत लपवून ठेवलेल्या ठिकाणी गांजाची लागवड आढळून आली.
घनदाट जंगलात पाच ठिकाणी लागवड
कारवाईदरम्यान पथकाला अभयारण्यातील घनदाट आणि दुर्गम जंगलात पाच स्वतंत्र ठिकाणी गांजाची शेती आढळली. या सर्व ठिकाणांचे एकत्रित क्षेत्रफळ २.८७ हेक्टर होते.
अभयारण्याचा दुर्गम भूभाग, घनदाट जंगल, वन्यप्राण्यांपासून असलेला धोका आणि मोबाईल संपर्काची अनुपलब्धता यामुळे या मोहिमेसमोर अनेक अडचणी होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करून कारवाई पूर्ण केली.
रोटाव्हेटरने नष्ट केले पीक
लागवड आढळल्यानंतर संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषी वापरातील रोटाव्हेटर या यंत्राच्या मदतीने गांजाचे पीक नष्ट करण्यात आले.
या कारवाईनंतर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बेकायदा लागवडीमागे कोणाचा सहभाग होता आणि त्यासंदर्भात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
देशभरातील कारवाया सुरू ठेवण्याचा निर्धार
अंमली पदार्थांच्या बेकायदा लागवडीविरोधातील अशा मोहिमा पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे डीआरआय आणि केंद्रीय अंमली पदार्थ ब्युरोने स्पष्ट केले आहे. अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालणे आणि भविष्यात अंमली पदार्थमुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या दोन्ही संस्था कारवाई सुरू ठेवणार आहेत. धुळे जिल्ह्यातील अभयारण्यात झालेली ही संयुक्त कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग ठरली आहे.

