कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची घोषणा
मुंबई, दि. ३ : राज्यातील माथाडी कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालाची हाताळणी कामगारांकडून करून घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची घोषणा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केली. यासंदर्भातील विद्यमान नियमांची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची चढ-उतार किंवा वाहतूक करून घेतल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. पाठीचे विकार, सांध्यांचे आजार, स्नायूंच्या दुखापती आणि इतर शारीरिक समस्यांचा धोका वाढत असल्याने कामगारांच्या संरक्षणासाठी ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी जारी केलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत बोलताना मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की, माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये या विषयावर कोणताही मूलभूत मतभेद नसून कामगारांचे आरोग्य जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्याबाबत राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात लवकरच परिपत्रक काढून कामगारांकडून केवळ ५० किलोपर्यंतच वजनाची हाताळणी करण्याची अट लागू करण्यात येईल आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री फुंडकर यांनी यावेळी असेही नमूद केले की, महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या या सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी इतर राज्यांमध्येही प्रभावीपणे व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात येणार आहे. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत एकसमान धोरणाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १५ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ (लासलगाव) कार्यक्षेत्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार समित्या, व्यापारी संघटना, वाहतूक व्यवसाय, बियाणे महामंडळ, वखार महामंडळ तसेच इतर संबंधित आस्थापनांना ५० किलोपेक्षा अधिक वजनाची चढ-उतार अथवा हाताळणी कामगारांकडून करून घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय कामगार विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सर्व निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी नियमित पाहणी, तपासणी आणि आवश्यक नियंत्रण यंत्रणा सक्रिय ठेवाव्यात, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
बैठकीस माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विविध माथाडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील लाखो माथाडी कामगारांच्या आरोग्य संरक्षणासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून कामगारांच्या सुरक्षित कामकाजासाठी अधिक सक्षम आणि मानवी दृष्टिकोनातून धोरणात्मक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत कामगार क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
