जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ
मुंबई, दि. २७ : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देत तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक सहभागाचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. हर्षदीप कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीविषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम, कर्करोगासह विविध आजारांचे वाढते प्रमाण आणि युवकांमध्ये वाढणारे व्यसन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ. कांबळे यांनी आपल्या भाषणात विशेषतः २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याकडे लक्ष वेधले. युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तंबाखूमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी केवळ शासनाच्या उपाययोजना पुरेशा नसून समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी महाराष्ट्र राज्याने सन २०११ मध्ये व्यसनमुक्ती धोरण जाहीर करून देशात आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने आणखी प्रभावी पावले उचलण्यासाठी जनजागृती मोहिमा अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांचा समन्वय वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान ‘कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तंबाखूमुक्ती विषयक विविध माहितीपर पोस्टर्सचेही अनावरण करण्यात आले. या पोस्टर्स, पत्रके आणि माहितीपर कटआऊट्सच्या माध्यमातून तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
डॉ. हर्षदीप कांबळे आणि आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या विविध संस्थांच्या स्टॉलना भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या स्टॉलमध्ये तंबाखूमुक्ती, आरोग्य जागरूकता आणि व्यसनमुक्त जीवनशैली याविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांसह विविध संस्थांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमास मुंबई शहर संघटक चेतना सावंत, ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील तसेच नशाबंदी मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी ३१ मे रोजी जगभर ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ पाळला जातो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यधोक्यांविषयी जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे हा या दिनामागील प्रमुख उद्देश मानला जातो.
