महाराष्ट्रातील आठ मान्यवरांचा ‘पद्म’ पुरस्कारांनी गौरव; अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’
नवी दिल्ली, दि. २५ : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे संपन्न झाले. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील ६६ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश होता. या टप्प्यात दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.
यंदा महाराष्ट्रातील दोन मान्यवरांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी छोट्या बिल डिस्काउंटिंग व्यवसायापासून देशातील अग्रगण्य खासगी बँक उभी करत भारतीय बँकिंग क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पीयूष पांडे यांनाही मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी नीता जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारतीय जाहिरात क्षेत्रात नवकल्पनांना चालना देण्यात आणि सर्जनशीलतेला नवे परिमाण देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पाच मान्यवरांची निवड करण्यात आली. सामाजिक कार्यासाठी जनार्दन बापुराव बोठे यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात जलसंधारण, शिक्षण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेद्वारे अनेक गावांमधील पाणीटंचाई कमी करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘तमाशा’ जागतिक स्तरावर पोहोचविणारे ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र असलेल्या रघुवीर खेडकर यांनी तमाशा कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यही प्रभावीपणे केले आहे.
परभणीचे प्रयोगशील शेतकरी आणि भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी विकसित केलेल्या ‘दादा लाड तंत्रज्ञानामुळे’ कापूस उत्पादन वाढीस मदत झाली असून ‘लाल कंधारी’ गाईंच्या संवर्धनासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
नागपूरस्थित उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांना संरक्षण आणि खाणकाम उद्योगातील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला. ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून त्यांनी संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे प्राध्यापक जुझर वासी यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या प्रा. वासी यांनी वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
दरम्यान, मूळचे पुण्याचे असलेले डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्यालाही संयुक्तपणे ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली ३५ वर्षे त्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील बस्तर तसेच अबू झमाडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचविण्याचे कार्य केले आहे. ‘ट्रस्ट फॉर हेल्थ’च्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागातील कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी विशेष योगदान दिले असून सुमारे एक लाख आदिवासींना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा एकूण १३१ मान्यवरांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये १९ महिलांचा समावेश असून १६ मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची परंपरा या पुरस्कारांच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवण्यात आली आहे.
