“राज्यात इंधनाचा पुरेसा साठा; अफवांमुळे पेट्रोल-डिझेल विक्रीत मोठी वाढ” — मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. २६ : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई निर्माण झालेली नाही, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. काही भागांत अफवा आणि भीतीमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी केली जात असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक इंधनसाठा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्रालयात राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री छगन भुजबळ बोलत होते. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे तसेच विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील इंधन साठा, पुरवठा व्यवस्था आणि वाढत्या मागणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच स्वयंपाक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. तेल कंपन्यांनी नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती करून इंधन साठ्याबाबत योग्य माहिती पोहोचवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
काही ठिकाणी किरकोळ घटनांच्या आधारे इंधनटंचाईच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी नागरिकांकडून गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केली जात असल्याने कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री भुजबळ यांनी स्थानिक प्रशासन आणि तेल कंपन्यांना अतिरिक्त साठेबाजी रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील जिल्हानिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार इंधन विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यभरात पेट्रोल विक्रीत सुमारे २३ टक्के वाढ झाली असून डिझेल विक्रीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यात पेट्रोल विक्रीत ४४ टक्के, बुलढाणा जिल्ह्यात ४७ टक्के, जालना जिल्ह्यात ४९ टक्के तर वर्धा जिल्ह्यात ४३ टक्के वाढ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
तेल कंपन्यांकडून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून साठा केंद्रांपासून पेट्रोल पंपांपर्यंत वितरण व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीत एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
राज्यातील इंधन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा केले.
