सकाळी ११ ते दुपारी ४.३० दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई
नागपूर, दि. १५ : हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी संभाव्य उष्णतेच्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर दि. १६ ते १८ मे २०२६ या कालावधीसाठी ‘यलो अलर्ट’ निर्गमित केला असून, नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असल्याने सकाळी ११ ते दुपारी ४.३० या कालावधीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, औद्योगिक आस्थापना तसेच खासगी संस्थांना विद्यार्थ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी उन्हात अनावश्यक वावर टाळावा, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर विशेष कृती आराखडा राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कोल्ड वॉर्ड’ तयार ठेवण्याबरोबरच उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. उष्णतेमुळे बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
मे आणि जून महिन्यात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने विभागभर जनजागृती मोहिमा राबविण्यावरही भर देण्यात येत आहे. उष्माघाताची लक्षणे, त्यावरील प्राथमिक उपचार आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नागरिकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी ‘सेंटर होम’सारख्या सुविधा उभारण्याच्याही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
नागपूर महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये ‘ग्रीन नेट’ उभारण्यास सुरुवात केली असून, आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर यांनाही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत दिली.
नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजना तातडीने लागू करण्यात आल्याचे सांगितले. या उपाययोजना दि. १६ जूनपर्यंत प्रभावी राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बैठकीत वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा सादर केला.
दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
