कर्मचारी आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
नवी मुंबई, दि. १४ : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी घणसोली येथील एनएमएमटी आगारामध्ये सुसज्ज व्यायामशाळा विकसित करण्यात आली असून तिचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. परिवहन उपक्रमातील कर्मचारी वर्गाच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये वाढ करून त्यांच्या कार्यक्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जात असून वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्य जनजागृती कार्यक्रम आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून घणसोली आगारामध्ये आधुनिक उपकरणांनी सज्ज व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. या सुविधेमुळे कर्मचारी वर्गाला कामाच्या ठिकाणीच नियमित व्यायाम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समिती सभापती विकास झंझाड, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, परिवहन समिती सदस्य राजेश राय, यशपाल ओव्होळ, अभिजीत पेडणेकर, रोशन पाटील, शीतल भोईर तसेच परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, विवेक अचलकर, दीपिका पाटील, उमाकांत जंगले, निवृत्ती सिताप आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महापौर सुजाता पाटील यांनी एनएमएमटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामकाजातील ताणतणाव आणि जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला. परिवहन सेवा अखंडित ठेवण्यासाठी कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कामाच्या ठिकाणीच आधुनिक व्यायामशाळा उपलब्ध झाल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढेल तसेच व्यस्त दिनचर्येतूनही नियमित व्यायामासाठी वेळ देणे अधिक सुलभ होईल, असे मत महापौरांनी व्यक्त केले. निरोगी कर्मचारी हे सक्षम परिवहन व्यवस्थेचे आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परिवहन उपक्रमाने कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल स्तुत्य असल्याचे सांगताना महापौर सुजाता पाटील यांनी भविष्यातही अशाच आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. या व्यायामशाळेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होऊन त्याचा सकारात्मक परिणाम परिवहन सेवेच्या गुणवत्तेवरही दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
एनएमएमटी प्रशासनाकडून कर्मचारी कल्याण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून घणसोली आगारातील ही व्यायामशाळा त्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.
